भेटा राजकारणातील 'नटसम्राट', 'मोरुची मावशी' अन् 'ती फुलराणी'ला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 07:17 PM2019-03-27T19:17:01+5:302019-03-27T19:44:55+5:30

'अवघे जग ही रंगभूमी आहे' असं विख्यात नाटककार शेक्सपिअरनं म्हणून ठेवलंय. सध्या देशाच्या रंगभूमीवर निवडणुकीचं नाट्य रंगलंय. अनेक दिग्गज नेते त्यामध्ये सहभागी झाले आहेत. आपल्या राजकीय भूमिका मांडताना त्यांच्यातील अभिनय कौशल्यही पणाला लागत आहे. त्यामुळे हे नेते अभिनेतेही वाटू लागले आहेत. अशा काही निवडक नेत्यांमध्ये व मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांतील पात्रांमध्ये आम्हाला काही गमतीदार साम्यस्थळं आढळली. त्याचा प्रयोग आजच्या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सादर करत आहोत. या राजकीय स्वगतांचा विपर्यास करून त्याला गांभीर्याने घेत कुणी आपल्या भावना दुखावून घेऊ नयेत. (अभय नरहर जोशी)

टु बी ऑर नॉट टु बी... निवडणूक लढवावी की न लढवावी हा एकच सवाल आहे... या राजकारणाच्या चव्हाट्यावर अजून किती दिवस राहावं, हा एकच सवाल आहे. जगावं आतापर्यंत मिळालेल्या यशाच्या समाधानानं की फेकून द्यावीत या बदलत्या राजकीय भूमिकांची लक्तरं, त्यात गुंडाळलेल्या जाणिवांच्या यातनांसह राजकारणाच्या काळ्याशार डोहामध्ये... की काढावा सर्वांचा काटा एकाच प्रहारानं... आणि करावं सर्वांना चितपट कमळाला, पंजाला, धनुष्याला अन् अन् रेल्वे इंजिनालाही...

न्यायमूर्ती महाराज, माझ्या विद्वान राजकीय विरोधकांनी इतकी आग माझ्यावर पाखडली आहे. त्यांनी माझं वर्णन करताना मराठी भाषेतील कोणतीही विशेषणं शिल्लक ठेवलेली नाहीत. काकांचा भरकटलेला पुतण्या काय, मॅनेजर काय, राष्ट्रवादीची बी टीम काय, कार्टूनिस्ट काय, बारामतीचा पोपट काय... पण तो मी नव्हेच!... चोर सोडून संन्याशाला मुसक्या बांधल्या आहेत. साप समजून ते दोरीच बडवत आहेत. मोठमोठ्या लोकांच्या डोळ्यांत धूळफेक करणारा, नोटाबंदीद्वारे अनेकांच्या संसारावर नांगर फिरवणारा प्रधान सेवक देशभर फिरतोय, तरी माझे विरोधक या खऱ्या गुन्हेगाराला दोषी धरायचे सोडून माझ्यासारख्या गरिबाला शिव्याशाप देत बसले आहेत. नानाविध सोंगं घेऊन वावरणारा प्रधान सेवक तुम्हाला दोषी आढळत नाही. या सर्व सत्ताधाऱ्यांनी संगनमत करून मला दोषी ठरवलंय. पण न्यायाधीश महाराज मला असं सांगायचंय की तो मी नव्हेच!... एका परमेश्वराखेरीज माझ्यामागे कोण आहे? माझ्याविरुद्ध आरोप करणाऱ्यांचं समाधान होत असेल, जर त्याने महाराष्ट्राचं नवनिर्माण होत असेल, तर आपण मला जरूर कठोर शिक्षा द्या, ही शिक्षा भोगायला मी तयार आहे... पण तो मी नव्हेच!

कुणी पक्षाचं घर देता का घर? एका तुफानाला कुणी घर देता का घर? एक तुफान पक्षावाचून, चिन्हावाचून फिरतंय त्याला राहायला कुणी घर देता का घर?... या तुफानाला फार मोठं पद नको, मंत्रिपदाचा बंगला नको, इतर पदांचीही भेट नको, मोठमोठ्या फ्लेक्सचे सेट नको, फक्त हवं पक्षाचं घर... पंख मिटून पडण्यासाठी... आणखी एक विसरू नका बाबांना... त्यात आणखी दोन खुर्च्या हव्यात माझ्या दोन पिल्लांसाठी....

टांग टिंग टिंगा की टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा की टुंग... 'कमळी'नेच चोरलेत 'पंजा'चे एक्के, टांग टिंग टिंगा की टुंग... 'घड्याळबाबा'च्या काट्याला लागलाय भुंगा, टांग टिंग टिंगा की टुंग

(रागानं ताडकन उठते, मोदींना उद्देशून) - असं काय प्रधानमास्तर साहेब? मी देशद्रोही काय? मी घटनाविरोधी? थांब. थांब. तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचाभरलाय घडा!... मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर, तुजं मसणात गेलंय ग्यान... तुझी नोटाबंदी, तुझी जीएसटी, तुझी कर्जमाफी, तुझं सर्जिकल स्ट्राईक, तुझी छप्पन इंची छाती, मारे पैजंचा घेतोय इडा!... तुला शिकवीन चांगलाच धडा... तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज, म्हणशील ममतादीदी केम छो?, मागशील पाठिंब्याची मतं... मी म्हनन, काय आज इकडं कुठं?... हात पसरून मागशील भीक, मी म्हनन जरा इंग्रजी बोलायला शीक. मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट... सगळ्यांना म्हणशील हिच्या पाया पडा! तवा तुला शिकवीन चांगलाच धडा!... तवा तुला दाखवतेच बघ चौकीदारा, तू बघशील माझा तोरा!