शिवसेना-मनसे कार्यकर्त्यामधील 'तो' तुफान राडा; दगडफेक, नारेबाजी अन् बरंच काही... By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 06:15 PM 2020-08-03T18:15:16+5:30 2020-08-03T18:19:31+5:30
सध्या मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस बजावली आहे, यामुळे ठाण्यात शिवसेना-मनसे यांच्यातील संघर्ष वाढला आहे. सोशल मीडियावर दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत.
शिवसेना-मनसे यांच्यातील संघर्ष हा काही नवा नाही, मात्र आता सत्तेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आहेत तर शिवसेनेची हिंदुत्वाची स्पेस भरुन काढण्यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने झेंडा बदलत भगव्या राजकारणाची नव्याने सुरुवात केली आहे.
राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर त्यांनी मनसेची स्थापना केली, यानंतर शिवसेनेतील बहुसंख्य शिवसैनिक राज ठाकरेंच्या पाठिशी आले, त्यामुळे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक महाराष्ट्र सैनिक बनले, राज ठाकरेंप्रमाणे मनसेचे कार्यकर्तेही आक्रमक आहेत, त्यामुळे अनेकदा शिवसैनिक-महाराष्ट्र सैनिक यांच्यातील राडा रस्त्यांवर पाहायला मिळाला आहे.
अलीकडच्या काळात शिवसेनेने आपलं स्वरुप बदललं आहे. मात्र आजही शिवसैनिक आणि मनसेचे कार्यकर्ते यांच्यातील वाद कमी झाला नाही. शिवसेना मनसे यांच्यातील संघर्षाचा इतिहासही रक्तरंजित आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान या दोन्ही पक्षातील संघर्ष विकोपाला गेला होता, ओल्ड कस्टम हाऊस येथे सेना-मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला होता. याठिकाणी एकमेकांच्या पक्षाचे बॅनर्स फाडण्यात आले, इतकचं नव्हे तर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली.
शिवसेना-मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने भिडले होते, एकमेकांवर दगडफेक, काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या होत्या. यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची डोकी फुटली होती. शिवसेना-मनसे यांच्यातील हा संघर्ष अतिशय तीव्र स्वरुपाचा होता. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात घोषणाबाजी करत होते.
त्यानंतर मानुखर्द महाराष्ट नगर येथे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांच्याकडून निवडणुकीत पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत मनसे-शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले होते, यावेळीही कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. यात काही पोलीसही जखमी झाल्याचं पाहायला मिळालं होतं.
२०१८ मध्ये लोअर परेल येथील पूलाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली होती, तत्कालीन आमदार सुनील शिंदे आणि मनसे पदाधिकारी संतोष धुरी यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते त्यावेळी दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता.
२०१९ मध्ये तत्कालीन मनसे वाहतूक सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांनाही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती, पासपोर्ट घोटाळ्याप्रकरणी केलेल्या मारहाणीनंतर पोलिसांनी ही नोटीस बजावली, तेव्हा मनसेकडून नांदगावकर यांच्या पाठिशी वकिलांची फौज तयार केली होती. नितीन नांदगावकर सध्या शिवसेनेत आहेत.
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना तडीपारीची नोटीस आणि त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामागे शिवसेना नेते पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा दबाव आहे असा आरोप मनसेने केला आहे, त्यानंतर ठाण्यात मनसे-शिवसेना यांच्यातील वाद वाढत चालला असून दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.