शिवसेनेच्या तीन 'M' ला भाजपाने दिले दोन 'N' ने उत्तर; युती तुटण्याची हीच आहे चिन्हं? By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 10:29 AM 2019-09-19T10:29:55+5:30 2019-09-19T10:34:07+5:30
विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांत होईल मात्र शिवसेना-भाजपाचं जागावाटप अद्याप झालं नाही. शिवसेनेला 120 पेक्षा अधिक जागा सोडण्यास भाजपा तयार नाही. तर शिवसेनाही निम्म्या जागांसाठी आग्रही आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मंदिर, मोटार आणि मेट्रो या मुद्द्यावरुन भाजपाला लक्ष्य केलं आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी नाणार आणि नारायण राणे यांच्यामाध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
राम मंदिराबाबत धाडसी निर्णय घ्यावा, मोटार वाहन कायद्यातील दंडाला विरोध, मेट्रो कारशेडसाठी आरेतील जागा घेण्यास शिवसेनेने विरोध केला आहे. परिवहन मंत्री दिवाकर रावतेंनी नवीन मोटार वाहन कायदा राज्यात लागू करण्यास स्थगिती दिली आहे. तर मुख्यमंत्र्यांनी नाणारबाबत पुन्हा चर्चा होऊ शकते असं सांगितलं आहे. नाणार रद्द करा या भूमिकेवर शिवसेनेने लोकसभेला युती केल्याचं सांगण्यात आलं होतं.
लोकसभा निवडणुकीपूर्वी युती करण्यासाठी शिवसेनेने नाणार प्रकल्प रद्द करावा अशी अट घातली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी रत्नागिरी दौऱ्यादरम्यान नाणारबाबत पुन्हा चर्चा सुरु होऊ शकते असं सांगितलं. तसेच राणेंच्या पक्षप्रवेशाबाबतही भाजपा सकारात्मक असल्याने युती तुटण्यासाठी ही महत्वाची कारणं ठरु शकतात.
तर नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाला शिवसेनेचा विरोध असल्याचं बोललं जातं. मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा सिंधुदुर्गात गेल्यानंतर राणे कुटुंबीयांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राणेंनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करुन काही दिवसांत भाजपात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली.