खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता?; भाजपा-शिवसेना युतीच्या पडद्यामागील घटना

By प्रविण मरगळे | Published: November 26, 2020 06:35 PM2020-11-26T18:35:54+5:302020-11-26T18:39:07+5:30

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपात बिनसलं आणि शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं, मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी शपथ घेतली, या सरकारला वर्षपुर्ती होत आहे, पण भाजपाने खरचं मुख्यमंत्रिपदाचा शब्द शिवसेनेला दिला होता का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

खरतरं मागील काळात शिवसेना भाजपासोबत सत्तेत असली तरी अनेकदा सरकारविरोधी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली होती, त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? यावर चर्चा रंगली होती, फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका मध्यस्थीच्या माध्यमातून एक बैठक झाली.

या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला, ज्यावर देवेंद्र फडणवीसांनी हे कठिण आहे, परंतु मी अमित शहांशी बोलून तुम्हाला सांगतो असं म्हणाले. यानंतर देवेंद्र फडणवीस दुसऱ्या रुममध्ये गेले आणि तिथून अमित शहांना फोन लावला, तेव्हा अमित शहांनी स्पष्ट शब्दात युती तुटली तरी चालेल असं सांगितले.

या घटनेनंतर काही दिवसांनी त्याच मध्यस्थीच्या माध्यमातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची भेट झाली, यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपासमोर तीन प्रमुख मागण्या करत एक विशेष मागणीसह देवेंद्र फडणवीसांना भेटले.

उद्धव ठाकरेंनी सांगितले, आमची पहिली मागणी अशी की, आम्हाला समसमान जागावाटप हवं, दुसरी आम्हाला कॅबिनेटमध्ये चांगली खाती मिळायला हवी आणि तिसरी मागणी पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडावी अशा तीन मागण्या देवेंद्र फडणवीसांना सांगण्यात आल्या.

याशिवाय एक विशेष मागणी म्हणजे उद्धव ठाकरेंनी या सर्व गोष्टी स्वत: अमित शहा यांनी मातोश्रीवर येऊन शब्द द्यावा अशी होती. या सर्व मागण्या भाजपाने स्वीकार केल्या. त्यानंतर जवळपास तुटलेली युती पुन्हा जुळली, अमित शहांच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली.

लेखिका प्रियम गांधी यांनी केलेल्या पुस्तकात या घडामोडींचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्यात लेखिकेने भाजपामुळे युती तुटल्याचा शिवसेना दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. भाजपाने शिवसेनेला अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता असं शिवसेनेने सांगितलं होतं.

यावर लेखिकेने युती तुटण्याचे साक्षीदार आहेत परंतु मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा कोणीही साक्षीदार नाही. जो पुढे येऊन सांगेल की माझ्यासमोर भाजपाने शब्द दिला होता. मला हे पुस्तक लिहण्यास ९ ते १० महिने लागले, ज्यादिवशी शपथविधी सोहळा झाला तेव्हा मी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली.

इतकचं नाही तर विधानसभा निवडणुकीवेळी मित्रपक्षांना सोडू नये अशी अमित शहांची इच्छा होती, त्यामुळे मध्यस्थीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवण्यात आला, यात शिवसेनेला पसंतीच्या १४० जागांमधील १२४ जागा भाजपा त्यांना देईल असं सांगितलं होतं, त्यामुळे विधासभेत ही युती टिकली.

आता सरकार बनलं आहे ते मोदीजी किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे सरकार नाही, सर्व मतदारांना मुर्ख बनवण्यात आलं, यामुळे मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं, जेणेकरून राज्यातील जनता आणि युवकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे असं लेखिका प्रियम गांधी यांनी सांगितले.