एनडीएची जीत, महाआघाडीची हार; बिहारच्या निकालांचे असे आहे सार By बाळकृष्ण परब | Published: November 11, 2020 11:39 AM 2020-11-11T11:39:33+5:30 2020-11-11T12:16:32+5:30
Bihar Assembly Election Results : बिहार विधानसभा निवडणुकीने आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांनी सध्याच्या बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाबाबत काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे... बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२५ जागा जिंकत बाजी मारली आहे. तर प्रचारात आघाडी घेऊनही तेजस्वी यादव यांच्या महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले आहे. बिहार विधानसभा निवडणुकीने आणि इतर राज्यातील पोटनिवडणुकांनी सध्याच्या बिहार आणि राष्ट्रीय राजकारणाबाबत काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या आहेत त्या पुढीलप्रमाणे
मोदी भाजपाची लोकप्रियता कायम बिहार आणि अन्य राज्यांत भाजपाने चांगले यश मिळवले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आमि भाजपा यांची लोकप्रियता कायम असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात वाढलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर भाजपासाठी ही दिलासादायक बाब आहे.
नितीश कुमार यांच्या नेतृत्वाला नकार बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या जेडीयूची कमालीची घसरण झाली. जेडीयूच्या घसरणीमुळे नितीश कुमार यांना जनतेने नाकारल्याचे दिसून येत आहे.
सुशांतसिंह राजपूत आत्महत्येचा मुद्दा निष्प्रभ बिहारमध्ये सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा भाजपा आणि नितीश कुमार यांनी सुरुवातीला प्रचार केला. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर टीका केली. मात्र हा मुद्दा चालत नसल्याचे पाहून तो प्रचारातून मागे घेतला.
बेरोजगार आणि स्थलांतरितांची मते महाविकास आघाडीला बेरोजगारी आणि कोरोनामुळे बिहारमधील आपल्या गावी परतलेल्या ४७ लाख स्थलांतरित कामगारांचे प्रश्न हा तेजस्वी यादव यांनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्याचा फायदा महाविकास आघाडीला झाला. बेरोजगार तरुण, स्थलांतरित कामगार आणि कुटुंबांनी नितीश कुमार यांच्याविरोधात मतदान केले.
चिराग पासवान यांच्या हाती निराशा, पण... लोकजनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या पक्षाविरोधात सुमारे १२२ उमेदवार उभे केले होते. त्यांच्या एकाच उमेदवाराचा विजय झाला असला तरी लोकजनशक्ती पार्टीच्या उमेदवारांमुळे जेडीयूचे मोठे नुकसान झाले. सुमारे २५ जागांवर जेडीयूचे उमेदवार चिराग पासवान यांच्या स्वळामुळे पडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. चिराग यांचा भाजपाचे छुपे पाठबळ असल्याची चर्चाही होती.
काँग्रेसला पुन्हा अपयश बिहारमध्ये दुय्यम पक्ष बनलेल्या कांग्रेसला या निवडणुकीतही अपयशाचा सामना करावा लागला. ७० जागा लढवणाऱ्या काँग्रेसचे केवळ १९ उमेदवार विजयी झाले. तर ५१ मतदारसंघात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. याचाही फटका महाविकास आघाडीला बसला.
ओवेसींचा बिहारच्या राजकारणात शिरकाव एमआयाएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी बिहारच्या निवडणुकीत ताकद लावली होती. एमआयएमचे तब्बल ५ उमेदवार विजयी झाले. सीमांचल भागात ओवेसींमुळे मुस्लिम मतांची मोठ्या प्रमाणात विभागणी झाल्याने त्याचा फटका महाआघाडीला बसला.