पंतप्रधान नरेंद्र मोदींची रणनीती यशस्वी होणार?; ‘NDA’ला दक्षिणेतील सर्वात मोठा नवा भिडू मिळणार By प्रविण मरगळे | Published: October 5, 2020 08:30 PM 2020-10-05T20:30:20+5:30 2020-10-05T20:34:39+5:30
महाराष्ट्र निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना आणि नुकत्याच कृषी कायद्याचा विरोध करत अकाली दलाने एनडीएची साथ सोडली. अशा परिस्थितीत भाजपा एनडीएचा विस्तार करण्याची योजना आखत असल्याची चर्चा आहे.
काही राज्यांच्या प्रभावशाली नेत्यांसोबत भाजपा नेत्यांची चर्चा सुरु आहे. सर्वात महत्त्वाची बातमी आंध्र प्रदेशातून येत आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, जगन मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वात वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते यांचे म्हणणं आहे की, त्यांचा पक्ष भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामील होऊ शकतो.
जगन मोहन रेड्डी सोमवारी संध्याकाळी नवी दिल्लीला रवाना झाले असून मंगळवारी सकाळी १०.३० वाजता ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पक्षाचे नेते म्हणाले, एनडीए मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी वायएसआरसीपीला आमंत्रित करू शकतात.
गेल्या दोन आठवड्यात आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची हा दुसरा दिल्ली दौरा आहे. २२ सप्टेंबर रोजी जगन यांनी दोन दिवसांचा दिल्ली दौरा केला आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. राज्याशी संबंधित मुद्द्यांव्यतिरिक्त, एनडीएत सामील होण्याबाबत त्यांच्याशी प्राथमिक चर्चा झाली असंही सांगण्यात येत आहे. त्यावेळी ते पंतप्रधान मोदींना भेटू शकले नाहीत.
मतदान सर्वेक्षणांशी संबंधित डेटा-विश्लेषक फर्म व्हीडीपी असोसिएट्सने सोमवारी ट्विट केले की, 'भाजपाने वायएसआरसीपीला २ कॅबिनेट आणि १ राज्यमंत्री (स्वतंत्र) ऑफर केली आहे. जगन रेड्डी यांनी पंतप्रधान मोदींशी विशेष चर्चेसाठी दिल्लीला बोलावलं आहे.
दुसरीकडे, जगन मोहन रेड्डी सरकारनेही मोदी सरकारने केंद्राकडून जीएसटी भरपाई करण्यासाठी अतिरिक्त कर्ज घेण्याची दिलेला पर्याय स्वीकारला, तरी तेलंगणासह १२ पेक्षा जास्त राज्यांनी याचा विरोध केला
आत्मनिर्भर भारत पॅकेजतंर्गत ऊर्जा क्षेत्रात सुधारणा केली जाईल, ज्यात कृषी क्षेत्रातील मीटर दुरुस्तीचाही समावेश आहे. मोदी सरकारची ही अट जगन यांनीही मान्य केली.
विशाखापट्टणमचे राजकीय विश्लेषक मल्लू राजेश म्हणतात, “वायएसआरसीपी एनडीएत सामील झाले तर ते जगन रेड्डीसह भाजपासाठीही जिंकण्याची सुवर्णसंधी असेल.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपात मतभेद निर्माण झाले, यावरुन शिवसेनेची एनडीएची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केला, शिवसेनेने केंद्रातील एकमेव मंत्रिपदाचाही राजीनामा दिला.
अलीकडेच शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी कृषी विधेयकाला विरोध करत राजीनामा दिला, राष्ट्रपतींनीही हा राजीनामा स्वीकारला, त्यानंतर अकाली दलाने एनडीएतून बाहेर पडण्याची घोषणा केली, त्यामुळे शिवसेना, अकाली दलासारखे जुने पक्ष एनडीएतून बाहेर पडल्यानंतर भाजपा नवीन मित्रपक्षाच्या शोधात आहे.