तरुणीवर अत्याचार केले, गावी जाऊन किर्तन ऐकलं; गुन्हा दाखल होताच झाला फरार, वाचा घटनाक्रम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 13:49 IST2025-02-28T10:18:24+5:302025-02-28T13:49:51+5:30
Pune Crime News : स्वारगेट येथे २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचर प्रकरणी आरोपी दत्ता गाडे याला पोलिसांनी अटक केली.

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
स्वारगेट बसस्थानकामध्ये पहाटे पाच वाजता आरोपी दत्तात्रय गाडे याने २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. यानंतर तो शिरुर तालुक्यातील त्याचं जन्मगाव असलेल्या गुनाट या गावी पळून गेला.
आरोपी दत्ता गाडे याला ज्यावेळी पोलीस आपला शोध घेत आहेत, अशी माहिती मिळाली त्यावेळी तो फरार झाला. गावातील शेतातील ऊसाच्या फडात लपून बसला.
पण, त्या आधी तो गावात निवांत बसनेच प्रवास करत आला होता. बुधवारी रात्री गावातील काल्याचा किर्तनात त्याने सकाळी हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कोणताच तणाव नव्हता. पण, ज्यावेळी पोलीस त्याच्या मागावर लागले आहेत हे समजताच तो फरार झाला.
आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी कालपासून पोलिसांनी त्याच्या गावात सर्च ऑपरेशन सुरू केले होते.
गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. पण दिवसभरात तो पोलिसांच्या हाती लागला नाही, यानंतर पोलिसांनी ड्रोनचा वापर केला, पण तरीही तो सापडला नाही.
दिवसभर शोधमोहिम करुन आरोपी पोलिसांना सापडला नव्हता. रात्र झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम बंद केली नाही, रात्रीही त्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतात त्याचे कपडे सापडल्यामुळे तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला.
यानंतर पोलिसांना आणखी शोध वाढवला. परिसरात ऊसाची शेती असल्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधण्यास अडचणी यायला लागल्या. पोलिसांना आरोपीचे कपडे ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी त्याचा शोध सुरू ठेवला.
दिवसभर शोधमोहिम सुरु ठेऊनही तो सापडला नाही, अखेर रात्री तो एका ओळखीच्या घरात पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. यावेळी आरोपीने एक लिटर पाण्याची बाटली भरुन त्याने पुन्हा एकदा शेतात पळ काढला.
पोलिसांनी त्या घराच्या आजूबाजूच्या शेतात त्याचा शोध घेतला, यानंतर पोलिसांना त्याचे कपडे सापडले. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.