हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टने यंदा दिल्लीतील श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृतीचा देखावा साकारला आहे. श्री स्वामी नारायण मंदिराच्या प्रतिकृती जवळच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी वाडा आहे. उत्सवप्रमुख व विश्वस्त पुनीत बालन यांनी नुकतेच त्याचे नूतनीकरण केले आहे. या वाड्याच्या माध्यमातून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांचा ब्रिटीश साम्राज्याविरोधातील लढ्याचा इतिहास, ब्रिटिशांविरोधात लढाईसाठी वापरलेली शस्त्रास्त्रे ही येथे पाहायला मिळत आहेत. गणेशोत्सव काळात कलाकार, राजकीय नेते, क्रीडापटू अशा अनेक दिग्गजांनी भेटी दिल्या. तसेच श्रींची आरती करून भाऊरंगारी भवनातील क्रांतिकारकांचा इतिहासही जाणून घेतला. यावेळी श्रीमंत भाऊसाहेब रंगारीचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.