Ganpati Festival : 'हे' आहेत पुण्यातील मानाचे पाच गणपती; असं दिमाखात झालं आगमन By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 08:25 PM 2021-09-10T20:25:35+5:30 2021-09-10T20:31:14+5:30
पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३५ वे वर्ष आहे. १८८७ साली या मंडळाची स्थापन झाली होती. (Ganpati Festival Five important Ganpati in Pune) कसबा गणपती - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठापना खासदार गिरीश बापट व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३८ मिनिटांनी झाली. दरवर्षी पारंपरिक वाद्यांच्या निनादात विराजमान होणारी ’श्रीं’ची मूर्ती यंदा मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परंपरेप्रमाणे पालखीतून उत्सव मंडपात आणण्यात आली. (फोटो - तन्मय ठोंबरे)
तांबडी जोगेश्वरी गणपती - मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या ’श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना वेदभवनचे प्राचार्य वेदमूर्ती मोरेश्वर घैसास गुरुजी यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी झाली. मूर्ती मंडपात आल्याने बालिकांच्या हस्ते ‘श्रीं’चे औक्षण करण्यात आले. सनई-चौघड्याच्या मंगलमयी सुरावटीमधून ‘श्री’ची मूर्ती विराजमान झाली. (फोटो - तन्मय ठोंबरे)
गुरुजी तालीम गणपती - पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेल्या गुरुजी तालीम गणपतीचे यंदा १३५ वे वर्ष आहे. १८८७ साली या मंडळाची स्थापन झाली होती. गुरुजी तालीम मंडळाच्या बाप्पांची प्राणप्रतिष्ठापना श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते दुपारी एक वाजता झाली. यंदा साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्यात येणार असल्याने सामाजिक उपक्रमांवर अधिक भर देण्यात येणार आहे. यावेळी स्थिर पद्धतीने ढोलवादन करण्यात आले. (फोटो - तन्मय ठोंबरे)
तुळशीबाग गणपती - श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या श्रींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना उद्योजक युवराज ढमाले यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ३० मिनिटांनी करण्यात आली. मंदिराभोवती घंटी महालाची आकर्षण सजावट सरपाले बंधूनी साकारली आहे. गणेश याग मंत्रजागर अशा धार्मिक विधींसह बाप्पांचे स्वागत करण्यात आले आहे. स्थिर पद्धतीने ढोलवादन करून ‘श्रीं’चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. (फोटो - तन्मय ठोंबरे)
केसरीवाडा गणपती - मानाचा पाचवा गणपती म्हणून नावलौकिक असलेल्या केसरीवाडा गणेशोत्सव मंडळाच्या वतीने परंपरेनुसार पालखीतून ’श्रीं’ची मूर्ती केसरीवाड्यात आणण्यात आली आली. केसरीचे विश्वस्त रोहित टिळक व त्यांच्या पत्नी प्रणिती टिळक यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. सनई चौघड्याच्या मंगलमय वातावरणात सर्व धार्मिक विधी करण्यात आले. उत्सवादरम्यान काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. (फोटो - तन्मय ठोंबरे)