गौरव आहुजाने घेतला युटर्न...! पुण्याहून कोल्हापूरला गेलेला, तिथून कुठे निघालेला?; दिवसभरात त्याने काय केले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 12:40 IST2025-03-09T12:19:15+5:302025-03-09T12:40:14+5:30

काल पुण्यातील येरवडा येथील चौकात गौरव आहुजा या तरुणाने अश्लील चाळे केल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी काल सातारा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

येरवडा चौकात मद्यधुंद अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील वर्तन करणारा गौरव आहुजा हा जवळपास १०-१२ तासांनी पोलिसांना शरण गेला आहे.

तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तो पसार झाला होता.

रात्रीपर्यंत त्याने प्रसारमाध्यमांना मुलाखत, एक व्हिडीओ जारी करून माफी मागितली आहे. दरम्यान, काल दिवसभरात त्याने कुठे-कुठे प्रवास केला याची माहिती समोर आली आहे.

गौरव आहुजा याने पुण्यातील येरवडा चौकात अश्लील चाळे करुन कोल्हापूरच्या दिशेने गाडी घेऊन गेला. कोल्हापूरात त्याची स्वत:ची बीएमडब्लू कार पार्क केली. तिथून तो दुसरीच कार घेऊन धारवाडच्या दिशेने रवाना झाला.

येरवडा चौकात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा पुण्यावरून कोल्हापूरला गेला. कोल्हापूर शहराच्या २० किलोमीटर अलीकडे त्याने बीएमडब्लू कार पार्क केली.

यावेळी त्याने ऑटो वाल्याला धारवाडला जाण्याची चौकशी केली. त्यासाठी चारचाकी भाड्याने मिळेल का? अशी चौकशी केली. यावेळी एका स्थानिक रिक्षावाल्याने त्याला गाडी मॅनेज करून दिली.

रस्त्यात संकेश्वरपर्यंत गेल्यावर गौरव याने ड्रायव्हरला गाडी पुण्याच्या दिशेने वळवायला सांगितली. पुन्हा येरवड्याला सोडा, असं तो ड्रायव्हरला म्हणाला.

या ड्रायव्हरलाच त्याने माफी मागताना व्हिडीओ रेकॉर्ड करायला सांगितला.

व्हिडीओ तयार करून त्याने मित्रांना व्हायरल केला.