MPSCचे विद्यार्थी भेटले, पवारांचा भेटीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयात फोन; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 05:15 PM2024-08-23T17:15:32+5:302024-08-23T17:33:16+5:30

विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

एकाच दिवशी २५ ऑगस्ट रोजी आलेली बँकिंग क्षेत्रातील भरतीसाठी आयबीपीएस आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा तसेच पूर्व सेवा परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ जागांचा न झालेला समावेश या पार्श्वभूमीवर पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची दखल घेत काल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

आयोगाने २५ ऑगस्टची परीक्षा पुढे ढकलली असली तरी एवढ्यावरच विद्यार्थ्यांचं समाधान झालं नसून आमच्या अन्य मागण्याही मान्य कराव्यात, अशी विद्यार्थ्यांची आग्रही मागणी आहे.

या विद्यार्थ्यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

पुढे ढकललेली परीक्षा कधी घेणार? या परीक्षेमध्ये कृषीच्या राजपत्रित २५८ जागांचा समावेश करणार की नाही? आणि संयुक्त गट ब व क ची जाहीरात कधी काढणार? या प्रश्नांबाबत आपण आयोगाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी शरद पवारांकडे केली.

विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत उद्याच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला, परंतु उद्या मुख्यमंत्री महोदय उपलब्ध नसल्याने या महिनाअखेरपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन शरद पवार यांनी दिलं आहे.

दरम्यान, शरद पवार आणि मुख्यमंत्र्‍यांची भेट कधी होते आणि स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य होतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.