PHOTOS: रंगीबेरंगी फुलांनी सजले 'एम्प्रेस गार्डन'; रविवारपर्यंत पुष्पप्रदर्शनाचा आनंद लुटता येणार By श्रीकिशन काळे | Published: January 25, 2024 04:28 PM 2024-01-25T16:28:57+5:30 2024-01-25T16:38:12+5:30
हजारो विविधरंगी फुलांना आलेला बहार, कारंज्यांची मनमोहक दृश्य, बोन्सायचे विविध झाडं, चिमुकल्या रोपांच्या नर्सरी अशा अतिशय सुंदर वातावरणात एम्प्रेस गार्डनमध्ये पुष्पप्रदर्शनाला गुरूवारपासून (दि.२५) सुरवात झाली आहे. आज दुपारी साडेबारा वाजता उद्घाटन झाल्यानंतर नागरिकांनी पुष्पप्रदर्शन पहायला गर्दी केली. रंगीबेरंगी फुलांसोबत पुणेकरांनी सेल्फी घेतला. दरवर्षी एम्प्रेस गार्डन येथे फ्लॉवर शोचे आयोजन करण्यात येते. यंदा या शोचे उद्घाटन पोलीस आयुक्त कार्यालय झोन चारचे उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या हस्ते झाले.
या प्रसंगी एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त प्रतापराव पवार, सचिव सुरेश पिंगळे, अनुपमा बर्वे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. हे पुष्प प्रदर्शन २८ जानेवारीपर्यंत सकाळी ९ ते सायंकाळी ७.३० पर्यंत नागरिकांसाठी खुले असणार आहे.
यामध्ये शंभरहून अधिक विविध नर्सरी, पुष्प प्रदर्शन असे स्टॉल्स मांडण्यात आले आहेत. ॲग्री हॉर्टीकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न इंडियातर्फे गार्डनचे कामकाज पाहिले जाते.
१८३० पासून ही संस्था कार्यरत असून, एम्प्रेस गार्डनला गेल्या कित्येक वर्षांपासून ते सांभाळत आहेत. अतिशय निसर्गरम्य असे हे गार्डन असून, दररोज हजारो नागरिक भेट देतात.
यंदाच्या पुष्पप्रदर्शनात फुलांची कलात्मक मांडणी, भाजीपाला स्पर्धा, आकर्षक व शोभिवंत पानांच्या कुंड्या तयार करून ठेवल्या आहेत.
पुष्प प्रदर्शनानिमित्त दरवर्षी बाग विविध प्रकारच्या उद्यान रचना, आकर्षक कुंड्यांची मांडणी, विविध पानाफुलांची रचनात्मक मांडणी करून आकर्षकरीत्या सजविते. यंदाही बाग सुंदर सजविण्यात आली आहे
कुंडीमध्ये भाजीपाला कसा लावायचा, तो कसा वाढवायचा यासाठी खास विभाग ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना त्याचा अधिक फायदा होऊ शकतो.
एम्प्रेस गार्डनमध्ये केवळ फुलांची सजावट नाही, तर इतरही अनेक गोष्टी पहायला मिळत आहेत.
लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळ असून, खाद्यजत्राही भरविण्यात आली आहे.
नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोप ठेवण्यात आली आहेत. आकर्षक पुष्परचनाही पाहता येणार आहे.