कभी कभी तो लगता है अपुनिच भगवान है ! पुणे अपघातानंतर अख्खी यंत्रणाच संशयात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 05:38 PM2024-05-27T17:38:54+5:302024-05-27T18:01:51+5:30

पुणे पोर्श कार अपघात प्रकरण सुरुवातीपासून चर्चेत आहे. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे झालेत. श्रीमंत बापाचा अल्पवयीन मुलगा विना रजिस्ट्रेशन, विना परवाना कार चालवतो आणि २ जणांचा जीव घेतो. हा गुन्हा इतक्यावरच थांबत नाही तर त्यानंतर पोलीस, आमदार, डॉक्टर आणि बचावासाठी मुलाच्या बाप-आजोबाने केलेले युक्तिवाद यामुळे संपूर्ण यंत्रणाच दोषी आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडला आहे.

सुरुवातीला या घटनेकडे पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर येरवडा पोलीस स्टेशनचे २ अधिकारी घटनास्थळी पोहचले त्यांनी कुठल्याही वरिष्ठाला अथवा कंट्रोल रुमला घटनेची माहिती दिली नाही. या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला आहे. या पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला तात्काळ मेडिकल चाचणीसाठीही घेऊन गेले नाहीत.

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन मुलाला पिझ्झा बर्गर खायला दिल्याचा आरोप, पुणे पोलीस आयुक्तांनी हा आरोप खोडला आहे. पोलिसांनी कुठल्याही प्रकारे आरोपीला विशेष ट्रिटमेंट दिली नाही. कस्टडीमध्ये आरोपीला पिझ्झा आणि बर्गर खायला दिला नसल्याचं आयुक्तांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी स्थानिक आमदार पोलीस ठाण्यात पोहचले. बिल्डर विशाल अग्रवाल यांच्या फोननंतर आमदारांनी पोलीस ठाणे गाठले. त्याठिकाणी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र मी कुठलाही दबाव आणला नाही असं सांगत आमदारांनी आरोप फेटाळले. कायदेशीर रित्या पोलिसांनी त्यांचे काम केले असल्याचं आयुक्त सांगतात.

आरोपी नशेत नव्हता असं आधी सांगितलं जात होतं, परंतु पब आणि कारच्या सीसीटीव्ही फुटेजमधून त्याचे कृत्य समोर आलं. या फुटेजमध्ये तो पबमध्ये बसून दारू पिताना दिसतो. अल्पवयीन आरोपीला मेडिकल चाचणीसाठी ससून हॉस्पिटलला नेले. परंतु त्याठिकाणी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ज्यात त्याने दारू घेतली नव्हती असं दाखवण्यात आले. आता या प्रकरणी रक्ताचे नमुने बदलणाऱ्या २ डॉक्टरांवरही कारवाई म्हणून अटक केली आहे.

प्रथमदर्शनी सुरुवातीच्या तपासात आणि FIR गुन्हा दाखल करण्यात निष्काळजीपणा झाल्याची कबुली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. अल्पवयीन मुलाचे मेडिकल तपास रिपोर्टही बदलले गेले. त्यामुळे श्रीमंत बापाच्या मुलाला ज्याने २ जणांचा जीव घेतला त्याला वाचवण्यासाठी यंत्रणेने जाणुनबुजून चुका केल्याचा संशय निर्माण होत आहे.

इतकेच नाही तर आरोपी अल्वपयीन असल्याने त्याला जुवेनाइल आयोगासमोर नेले. तिथे त्याला ३०० शब्दांचा निबंध आणि अन्य अटीवर सशर्त जामीन मिळाला. अवघ्या १४ तासांत आरोपीला जामीन मिळाल्यामुळे लोकांमध्ये संताप निर्माण झाला.वाढता दबाव पाहता पोलिसांनी जुवेनाइल जस्टिस बोर्डाच्या निर्णयाला आव्हान देत सत्र न्यायालयात याचिका केली. तिथे कोर्टाने आरोपीला ५ जूनपर्यंत बालसुधार गृहात पाठवलं.

यातच अल्पवयीन मुलाच्या कुटुंबाने मुलाचा गुन्हा स्वत:च्या नावावर घेण्यासाठी चालकावर दबाव आणला. ज्यावेळी अपघात झाला तेव्हा चालक गाडी चालवत होता. अल्पवयीन मुलगा बाजूला बसला होता असा बनाव केला. त्यात ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचेही तपासात समोर आले. त्यानंतर पुरावे नष्ट करणे या अंतर्गत मुलाच्या बापावर गुन्हा नोंदवण्यात आला.

अल्पवयीन आरोपीच्या वडिलांवर गुन्हा दाखल झाला, त्याला अटक केली. आजोबांवर ड्रायव्हरला धमकावणे आणि अपहरण करणे असा गुन्हा दाखल झाला. २५ मे रोजी त्यांनाही अटक झाली. २८ मे पर्यंत आरोपीच्या आजोबालाही पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आरोपीच्या वडिलाला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे.

ज्या पोर्श कारनं अपघात झाला, ना त्याचे रजिस्ट्रेशन होतं, ना मुलाकडे परवाना. १७५८ रुपये फी न भरल्याने पोर्श कारचं रजिस्ट्रेशन मार्चपासून पेडिंग होतं. या कारची किंमत २ कोटी इतकी, बंगळुरूतून डिलरकडून ही कार विकत घेतली होती. परंतु महाराष्ट्रात आरटीओकडे रजिस्ट्रेशन केले नव्हते. या प्रकरणानंतर पोलीस प्रशासन एक्शन मोडवर आलं आहे. त्यांनी आतापर्यंत १४ बारचं लायसन्स सस्पेंड केले आहे.