स्वारगेट बस डेपोत तरुणीवर एकदा नव्हे दोनवेळा अत्याचार;मेडिकल रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 08:53 IST2025-02-27T08:25:27+5:302025-02-27T08:53:04+5:30
Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात काल एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.

Pune Crime News : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर काल बुधवारी अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेने पुण्यात खळबळ उडाली, अत्याचाराच्या घटनेने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.दरम्यान, काल रात्री उशीरा त्या तरुणीचे मेडिकल रिपोर्ट समोर आले आहेत.
काल पहाटे पाच वाजता स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर अत्याचाराची घटना घडली. या प्रकरणी तरुणीने पोलिसात तक्रार दिली. यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला. तरुणीला मेडिकलसाठी रुग्णालयात नेण्यात आले, आता तरुणीचे मेडिकल रिपोर्ट आले आहेत.
तरुणीचे मेडिकल रिपोर्ट ससून रुग्णालयातून पोलिसांना देण्यात आले आहेत. त्या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. पीडितेवर आरोपीने एकदा नव्हेतर दोनवेळा अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती रिपोर्टमधून समोर आली आहे.
अवध्या १०० फुटांवर पोलिस चौकी, १८ सीसीटीव्ही, सुरक्षारक्षकांचा फौजफाटा असा सुरक्षेचा सरंजाम असतना, दत्तात्रय रामदास गाडे (३६, शिक्रापूर) या गुन्हेगाराने पीडितेवर दोनवेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
नेहमीच प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेल्या स्वारगेट बसस्थानकात अनेक एसटी बसेस धूळखात पडून आहेत. घटनेनंतर राजकीय कार्यकर्त्यांनी या बसेसची पाहणी केली. त्यावेळी अनेक बसेसमध्ये दारूच्या बाटल्या आणि कंडोमच्या पाकिटांचा खच पडल्याचे उजेडात आले.
राष्ट्रीय महिला आयोगाने घटनेची दखल घेतली आहे. याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी मुंबई, महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्राद्वारे दिले आहेत.
अत्याचाराच्या घटनेनंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा त्याच्या गुनाट येथील घरी गेला होता. गुन्हा दाखल होईल या भीतीने तो पळून गेला. दत्तात्रयचे लग्न झाले असून, आई-वडील, बायको, मुलगा, मुलगी आणि लहान भावासोबत तो राहतो.
गाडे हा सराईत गुन्हेगार असून, पूर्वी जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसांत दाखल आहेत. आता त्याचा शोध घेण्यासाठी आठ पथके तैनात केली असून, त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नराधम दत्तात्रय गाडे याचा नेहमी स्वारगेट स्थानकात वावर असायचा. इनशर्ट, शूज, मास्क असा त्याचा पेहराव असायचा. पोलिस असल्याचे तो भासवायचा, अशी माहिती सूत्रांनी दिली.