पुण्याला पावसाचा वेढा: लोक अडकले, झाडे कोसळली, भीषणता दाखवणारे 12 PHOTOS

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 12:24 PM2024-07-25T12:24:04+5:302024-07-25T12:36:35+5:30

मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुणे शहरासह जिल्ह्यात बहुतांश भागांत मागील काही दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.

शहरात काल रात्रीपासून पडलेल्या पावसामुळे सखल भागांत पाणी साचलं असून रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं आहे. तसंच अनेक सोसायट्याही पाण्याखाली गेल्या आहेत.

पाण्यामुळे अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. तसंच वेळ पडल्यास नागरिकांना एअरलिफ्ट केलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्‍यांकडून सांगण्यात आलं आहे.

मुसळधार पावसासह सोसाट्याचा वारा सुरू असल्याने शहरातील अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पावसाचा जोर लक्षात घेता पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर अस्थापनांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विसर्गामुळे सिंहगड रस्त्यालगतच्या नदीपात्रातील सोसायट्यांमधील नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी NDRFची दोन पथके कार्यरत आहेत.

मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग मोठ्या प्रमाणात असून या परिसरातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

पुरात अडकलेल्या नागरिकांना खाद्य पदार्थ व पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळीच जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणाचे प्रमुख सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातील पूरपरिस्थिती तसेच बचाव व मदतकार्याच्या तयारीचा आढावा घेतला.

साचलेल्या पाण्यात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकी वाल्यांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

खडकवासला तसेच जिल्ह्याच्या बहुतांश भागात मुसळधार पाऊस होत असल्याने प्रशासन तसेच आपत्ती निवारण यंत्रणेने सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना अजित पवार यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधण्याचे तसेच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी आदेश दिले आहेत.

पुणे शहरात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सिंहगड येथील एकता नगरी परिसरात भेट देत पाहणी करीत नागरिकांशी संवाद साधत मनपा अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ते निर्देश दिले.