बाळा जो जो रे... दशरथ नंदना... बाळा जो जो रे... चे स्वर आणि श्रीराम नामाच्या अखंड जयघोषाने पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात निनादले. पुणेरी पगडी आणि पारंपरिक वेशात सहभागी रामभक्तांच्या गर्दीने फुललेल्या मंदिरात २६२ व्या वर्षी श्रीरामनवमी उत्सव थाटात साजरा झाला. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी मंदिराच्या सभामंडपात लावलेला पाळणा हलला आणि रामनामाचा एकच नामघोष झाला. भक्तांनी फुलांची उधळण करीत श्रीरामजन्म सोहळा प्रत्यक्षपणे अनुभवला.