... यापुढे सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाही, पवारांनी स्पष्टच सांगितलं By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 01:26 PM 2021-09-07T13:26:14+5:30 2021-09-07T13:34:00+5:30
कोरोना संसर्गात थोडीशी वाढ दिसत असून मागील लाटेचा अनुभव लक्षात घेता, मी सर्व राजकीय पक्ष आणि संघटनांना विनंती करतो की, त्यांनी गर्दी होणारे राजकीय कार्यक्रम, सभा, मोर्चे त्वरित स्थगित करावेत.
इतर कार्यक्रम काटेकोरपणे नियमांत राहून साजरे करू शकता, मात्र आता आपल्याला मुळात तिसरी लाट येऊच द्यायची नाही, जनतेच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य द्या, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परत एकदा केले आहे.
राज्याचा मुख्यमंत्री म्हणून सरकारला या संकटाशी सामना करण्यासाठी संपूर्ण तयारीत राहण्याच्या स्पष्ट सूचना आहेतच, पण सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांना मी आवाहन करत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.
गर्दीचे कार्यक्रम टाळा. सण, उत्सव आले आहेत, त्यावर निर्बंध लावावेत असे कोणाला वाटेल? पण शेवटी आपले आरोग्य, प्राण महत्त्वाचे. उत्सव नंतरही साजरे करू, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनानंतर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि खासदार शरद पवार यांनीही सार्वजनिक कार्यक्रमांना जाणार नाही, हजारो लोकं जमतील, ते कार्यक्रम करणार नाही, असे म्हटलं आहे.
मी जुन्नरला कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेथे कार्यक्रमाच्या आयोजकांशी संपर्क केला, त्यांना विचारलं तुम्ही परवानगी घेतली का, पोलीस परवानगी घेतली, आरोग्य विभागाची परवानगी घेतली का? त्यांनी सर्व हो म्हटल्यावरच मी कार्यक्रमाला गेलो.
मी कार्यक्रमाला गेल्यावर पाहिलं, व्यासपीठावर सोशल डिस्टन्स होतं, पण समोर लोकं होते तिथे सोशल डिस्टन्स नव्हतं. ते मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे, यापुढे हजारोंच्या संख्येनं लोकं जमतील, अशा कार्यक्रमांना मी जाणार नाही.
तसेच, कार्यक्रम एका हॉलमध्ये असावा आणि तेथे सोशल डिस्टन्स म्हणजे दोन खुर्च्यांमध्ये एका खुर्ची रिकामी आहे का, याची पाहणी करूनच त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.