मुलांना खोटं बोलण्यापासून दूर ठेवायचंय? मग 'या' गोष्टींकडे लक्ष द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 02:54 PM2019-04-04T14:54:49+5:302019-04-04T15:02:40+5:30

लहान मुलांमध्ये अनेकदा खोटं बोलणं, काम टाळणं, गोष्टी लपवणं अशा सवयी असलेल्या दिसतात. मात्र त्याच्या या काही वाईट सवयी मुलांना त्यांच्या आयुष्यात धोकादायक ठरू शकतात. मुलांच्या अशा काही वाईट सवयीमुळे पालकांच्या चिंतेत भर पडते. मुलांना ओरडलं तरी फरक पडत नाही. अशा वेळी त्यांना समजून सांगणं अत्यंत गरजेचं असतं.

मुलांनी एखादी चूक केली तर पालक खूप ओरडतात अथवा मारतात. यामुळे पालक आणि मुलांमधील दुरावा वाढतो. मुलं मार मिळू नये यासाठी खोटं बोलण्यास सुरुवात करतात. त्यामुळे मुलांकडून काही चूक झाल्यास त्यांना त्यांची चूक लक्षात आणून द्या. तसेच प्रेमाने समजवा.

मुलांना समजून सांगताना पालकांनी त्यांच्या वागण्यात काही बदल करावेत. त्यांना ओरडण्यापेक्षा एखादी गोष्ट समजून सांगा. त्यांच्याशी मोकळेपणाने बोला. मुलांसोबत मोकळेपणाने संवाद साधल्यास मुलं पालकांना सर्व गोष्टी सांगतात.

पालकांच्या भीतीने मुलं अनेक गोष्टी लपवून ठेवतात. त्यामुळे मुलांच्या समस्या जाणून घ्या. त्यांना त्यांचं मत मांडण्याची संधी द्या. मुलांसोबत मैत्री करा. यामुळे पालक आणि मुलांमधील नातं घट्ट होतं.

मुलांच्या चुकीवर अनेकदा पालक ओव्हर रिअ‍ॅक्ट होतात. मात्र तसं करू नका कारण यामुळे गोष्टी बिघडू शकतात. तसेच मुलं जिद्दी होण्याची शक्यता ही अधिक असते. त्यामुळे मुलांना त्यांची चूक समजावून सांगा आणि त्यासाठी चांगली उदाहरणं द्या.

काही वेळा मुलं त्यांची चूक कबूल करत नाहीत. मग अशा वेळी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधा. त्यांना त्याची चूक कबूल करण्यासाठी, सुधारण्यासाठी सल्ला द्या. चूक केली असल्यास त्याबाबत माफी मागायला शिकवा.

आई-वडील कामामध्ये व्यस्त असल्याने मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे मुलं एकटी पडतात. तसेच चुकीच्या गोष्टींकडे आकर्षित होतात. त्यामुळे मुलांसोबत वेळ घालवा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेणे करून मुलं त्याच्या मनातील सर्व गोष्टी शेअर करतील.