तुमच्या दररोजच्या आयुष्यातील खास गोष्ट, काय आहे सोशल बायोम?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:09 IST2025-04-24T16:59:54+5:302025-04-24T17:09:00+5:30
What is Social Biome: सोशल बायोम ही संकल्पना सध्या बरीच चर्चेत आहे. सोशल बायोम म्हणजे प्रत्येक व्यक्तीभोवती असलेली सामाजिक परिसंस्था.

आपल्या रोजच्या जगण्यात आपले इतरांशी असलेले नातेसंबंध, आपण कुणाशी काय बोलतो, किती बोलतो, यावर आपली सामाजिक परिसंस्था तयार होत असते आणि ती आपल्या भावनिक, मानसिक आणि अगदी शारीरिक वाढीला, आरोग्याला आकार देत असते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
तुम्ही कुणाशी, काय बोलता, याबरोबरच बोलण्यासाठी, संवादासाठी तुम्ही कुठली माध्यमं, मॉडेल्स वापरता तेही तुमच्या सामाजिक परिसंस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं.
शरीराच्या वाढीसाठी जसे आपल्या ताटातले अन्नपदार्थ, त्यातून मिळतात त्या कॅलरीज आणि इतर पोषक घटक महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे निकोप सामाजिक परिसंस्थेसाठी, म्हणजे सोशल डाएटसाठी तुम्ही कुणाशी बोलता, काय बोलता, कसं बोलता, याची सरमिसळ असणं आवश्यक आहे, बोलता, याची सरमिसळ असणं आवश्यक आहे, असं तज्ज्ञ म्हणतात.
थोडक्यात, तुमच्या वर्तुळात अनेक प्रकारची माणसं हवीत आणि त्यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर, वेगवेगळ्या रीतीने तुमचा संवाद चालू हवा. तुमचं सोशल डाएट चांगलं असायला हवं, तर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी तुमच्या छान गप्पा व्हायला हव्यात.
ऑफीसमधल्या एखाद्या सहकाऱ्याशी उभ्या उभ्या छोटासा पण छान संवाद व्हायला हवा. एखाद्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर थोडंसं फॉरवर्ड फॉरवर्ड खेळत असाल तर तोही तुमच्या सोशल बायोमचा भाग आहे.
या सगळ्याचं उत्तम संतुलन साधणं जमत असेल तर जेवणाच्या ताटातल्या चौरस आहारासारखाच तुमचा सोशल डाएट आणि पर्यायाने सोशल बायोमही चौरस आहे, असं मानायला हरकत नाही.
हे सगळं करताना आपण सतत इतरांना आपल्यावर लादत राहाणं आवश्यक नाही, कधीतरी 'मी टाइम' 'पर्सनल स्पेस'ही असायला हवी. ती आवश्यक आहे, असंही शास्त्रज्ञ सांगतात.