काळा खजूर खाण्याचे ५ फायदे, हिमोग्लोबिन वाढेल आणि पचनही सुधारेल, हिवाळ्यात आहारात हवेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 06:35 PM2022-11-23T18:35:50+5:302022-11-23T18:55:39+5:30

Black Dates काळे खजूर अनेक खनिजांपासून समृद्ध आहे, त्यातील पौष्टिक तत्वे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.

खजूर. अतिशय उत्तम असा सुकामेवा. काळा खजूर खाणं हे आरोग्यासाठी अत्यंत फायदशीर आहे. अनेक आजारांवर उपचार म्हणून खजूर उपयोगी ठरतो. बाजारात अनेक प्रकारचे खजूर उपलब्ध आहेत. ज्यात ओला, सुका, तपकिरी, पिवळा, आणि काळ्या खजूरांचा समावेश आहे. काळे खजूर शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. हे काळे खजूर फायबर, लोह, प्रथिने, पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांपासून समृद्ध आहे. क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि आहारतज्ज्ञ गरिमा गोयल सांगतात काळा खजूर खाण्याचे ५ फायदे.

पोट निरोगी ठेवण्यासाठी काळ्या खजुराचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. कारण खजुरात भरपूर प्रमाणात फायबर असते. खजूर खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात आणि पोट निरोगी राहण्यास देखील मदत मिळते. पोटातील गॅस, अपचन, यासह इतर अनेक समस्या दूर करण्यासाठी खजूर खूप फायदेशीर आहे.

काळ्या खजुरात लोह भरपूर प्रमाणात आढळून येते. यासह रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढवण्यास मदत करते. तसेच लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी देखील खजूर उपयुक्त आहे. खजूर शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. अॅनिमियाच्या रुग्णांना खजूर खाण्याचा सल्ला दिला जातो.

काळे खजूर हाडे मजबूत करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात कॅल्शियम, तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात आहे, ज्यामुळे हाडे निरोगी राहण्यास मदत होते. दात आणि हिरड्या मजबूत करण्यासाठी देखील खजूर फायदेशीर आहे.

ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यासाठी मॅग्नेशियम, पोटॅशियम यांसारखी खनिजे खूप महत्त्वाची असतात, जी काळ्या खजूरमध्ये मुबलक प्रमाणात आढळून येते. खजूर रक्तातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास आणि चांगल्या कोलेस्टेरॉलला चालना देण्यासाठी देखील उपयुक्त आहे.

उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्टेरॉलची पातळी हृदयरोगासाठी खूप हानिकारक आहे. मात्र, काळे खजूर खाल्ल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या समस्यांपासूनही खजूर संरक्षण करते.

आपण खजूर दुधासोबत खाऊ शकते; अथवा रात्री झोपण्यापूर्वी दुधात उकळून खाऊ शकता. तसेच ३-४ खजूर रात्रभर पाण्यात किंवा तुपात भिजवून सकाळी खाऊ शकता. याशिवाय, शेक आणि स्मूदीमध्ये खजूर घालता येईल.