हिवाळ्यात छोट्याशा कुंडीतही जोमाने वाढणाऱ्या पाहा ‘या’ भाज्या, घरीच मिळेल ताजी ताजी भाजी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2024 04:21 PM 2024-11-09T16:21:45+5:30 2024-11-09T17:09:54+5:30
हिवाळा हा ऋतू काही भाज्यांच्या वाढीसाठी अतिशय पोषक ठरतो. या भाज्या तुम्ही तुमच्या बाल्कनीतल्या छोट्याशा कुंडीत लावल्या तरी त्या भरभरून वाढतात. त्या भाज्य नेमक्या कोणत्या ते पाहूया.
कोथिंबीर थंड हवामानात खूप जाेमाने वाढते. त्यामुळे एखादी पसरट आकाराची कुंडी पाहून तिच्यात कोथिंबीर जरूर लावून पाहा. माती नेहमीच ओलसर राहील आणि तिला ३ ते ४ तास चांगलं ऊन मिळेल याची मात्र काळजी घ्या.
हिवाळ्याच्या दिवसांत कुंडीमध्ये सिमला मिरचीही खूप छान वाढते. त्यासाठीच्या बिया किंवा लहान रोपं तुम्ही तुमच्या शहरातल्या नर्सरीमधून किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता. सिमला मिरचीसाठी जी कुंडी घ्याल ती थोडी खोलगट असावी तसेच पाण्याचा व्यवस्थित निचरा होणारी असावी. पाणी घट्ट धरून ठेवणाऱ्या मातीत सिमला मिरची खूप चांगली वाढत नाही. त्यामुळे तिच्यासाठी मिश्र प्रकारची माती वापरावी.
आपण नेहमीच बघतो की हिवाळ्यात पालेभाज्या अगदी मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. कारण पालेभाज्यांच्या वाढीसाठी हिवाळ्यातले वातावरण अनुकूल असते. त्यामुळे पालक कुंडीमध्ये लावून पाहायलाही हरकत नाही.
मेथीची भाजीही तुमच्या बाल्कनीतल्या एखाद्या पसरट कुंडीमध्ये खूप छान वाढू शकते. फक्त मेथीला खूप जास्त पाणी घालू नका. तसेच ती कुंडी ४ ते ५ तास भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
कुंडीत उगवलेल्या वांग्याचं भरीत किंवा भाजी करून खाणंही शक्य आहे. कारण वांग्याचं बी जमिनीत व्यवस्थित रुजण्यासाठी हिवाळ्यातले थंडगार वातावरण खूपच फायद्याचे ठरते.