पावसाळ्यात मुलं शाळेत जातात आणि दुखणं घेऊन येतात-५ पदार्थ खाऊ घाला, इम्युनिटी भरपूर वाढेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2024 09:10 AM2024-06-28T09:10:22+5:302024-06-28T09:15:01+5:30

पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांचे प्रमाण खूप वाढते. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की मुलांना शाळेतून इन्फेक्शन होतं आणि ते आजारी पडतात. मग घरात एकेक करून असे संसर्गजन्य आजार सगळ्यांनाच होतात.

मुलांचं आणि घरातल्या सगळ्याच सदस्यांचं आजारपण टाळायचं असेल तर मुलांना पावसाळ्याच्या दिवसांत काही पदार्थ आवर्जून खाऊ घाला. जेणेकरून त्यांची रेागप्रतिकारक शक्ती वाढेल आणि ते वारंवार आजारी पडणार नाहीत.

kangarookids.in यांनी प्रकाशित केलेल्या माहितीनुसार मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना हळदीचा काढा किंवा हळदीचं दूध नियमितपणे द्या. कारण हळदीमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि ॲण्टी इन्फ्लामेट्री घटक भरपूर प्रमाणात असतात.

तुमच्या स्वयंपाकात आल्याचा वापर करा. कारण रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आलं अतिशय उपयुक्त ठरतं.

लसूणामध्ये ॲलिसिन हा घटक असतो. शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढविण्यासाठी तो उपयुक्त ठरतो. लसूण उष्ण असल्याने त्याचे नियमित सेवन केल्यास त्याने वारंवार सर्दी होत नाही.

रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी व्हिटॅमिन सी देणारे लिंबूवर्गीय फळंही नियमितपणे मुलांना खायला द्या.

बदामामध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी बदाम खाणं फायदेशीर ठरतं.