वडे- भजी होतील कुरकुरीत, खमंग... कोणताही पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2023 03:59 PM2023-08-16T15:59:54+5:302023-08-16T16:09:12+5:30

साबुदाणा वडा असो किंवा अन्य कोणताही वडा किंवा भजी असो... तो पदार्थ कुरकुरीत आणि खमंग होण्यासाठी तळताना काय करावं, याची माहिती सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एका व्हिडिओद्वारे शेअर केली आहे.

कधीकधी तळताना पदार्थ बाहेरून छान खमंग तळल्यासारखा दिसतो. पण आतून मात्र कच्चा राहतो. किंवा आपल्याला हवा असतो तो कुरकुरीतपणा त्या पदार्थात येत नाही. हे टाळण्यासाठी कोणताही पदार्थ तळताना पुढील ५ गोष्टी लक्षात ठेवा, असं त्यांनी सांगितलं आहे.

यापैकी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तळण्यासाठी तुमच्या गॅस शेगडीचे जे सगळ्यात लहान बर्नर आहे ते वापरावे.

दुसरी गोष्ट म्हणजे तळण्यासाठी अगदी लहान आकाराची कढई वापरावी आणि तळायला ठेवण्यापुर्वी ती पूर्णपणे कोरडी आहे, याची खात्री करून घ्यावी.

तिसरी गोष्ट म्हणजे तळण्यासाठी ठेवलेले एवढेही जास्त तापू देऊ नये की त्यातून जळकट वास येऊ लागेल किंवा त्यातून खूप वाफा येऊ लागतील.

चौथी गोष्ट अशी की आधी त्या तळण्याच्या पिठाचा छोटासा गोळा करून कढईत टाका. तो जर कढईला न चिकटता व्यवस्थित तळला गेला, तरच पुढचे पीठ तळायला घ्या. नाहीतर तेल आणखी तापू द्या.

जोपर्यंत पदार्थाची एक बाजू तळून तो पदार्थ तेलावर तरंगणार नाही आणि कढईतून तेलाचे बुडबुडे येणं थांबणार नाही, तोपर्यंत तो पदार्थ उलटून टाकू नका.

तळताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम खूप मोठी ठेवून किंवा खूप कमी ठेवून कधीही तळू नये. गॅसची फ्लेम नेहमी मध्यम असावी