झाडांना 'या' ५ प्रकारचं जादुई पाणी द्या, फुलं येतील भरपूर- झाडं वाढतील भराभर, करून पाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2024 12:25 PM2024-03-12T12:25:55+5:302024-03-12T12:32:55+5:30

कधी कधी झाडांना फुलंच येत नाहीत, तर कधी कधी झाडांची चांगली वाढच होत नाही. बऱ्याचदा झाडांची पानं पिवळी पडून गळून जातात तर कधी कधी झाडांवर एखादा रोग पडतो.

झाडांच्या बाबतीतल्या अशा कोणत्याही समस्येवर उपाय पाहिजे असेल तर हे काही उपाय बघा. यामध्ये आपण झाडांना कोणत्या प्रकारचं पाणी घालायचं ते पाहणार आहोत. याला तुम्ही मॅजिकल वॉटर म्हणू शकता. कारण हे काही उपाय नियमितपणे केल्यास महिनाभरातच झाडांची भरभरून वाढ होईल.

झाडांची वाढ होत नसेल तर सोयाबिन एखादा संपूर्ण दिवस पाण्यात भिजत घाला. आणि त्यानंतर ते पाणी गाळून घेऊन झाडांना द्या. यातून झाडांना नायट्रोजन मिळेल आणि त्यांची चांगली वाढ होईल.

केळीची सालं १० ते १२ तासांसाठी पाण्यात भिजत घाला. यानंतर ते पाणी गाळून घेऊन झाडांना टाका. यामुळे झाडांना भरपूर फुलं येतील. कोणत्याही फुलझाडासाठी तुम्ही हा उपाय करू शकता.

झाडांची मुळं पक्की होण्यासाठी त्यांना फर्मेंटेड राईस वॉटर द्या. यातून त्यांना भरपूर प्रमाणात पोटॅश मिळतं जे मुळांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतं.

झाडांवर किडा पडला असेल, रोग पडला असेल तर लिंबू, संत्री, मोसंबी यांची सालं १० ते १५ तासांसाठी पाण्यात भिजत घाला. यानंतर हे पाणी गाळून घ्या आणि झाडांवर शिंपडा. झाडांवरचा रोग, किड निघून जाऊन त्यांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.

झाडांची पानं निस्तेज झाली असतील, गळून जात असतील तर हा एक उपाय करून पाहा. यासाठी अर्धा कप बिअर दिड ते दोन लीटर पाण्यात घाला आणि ते पाणी झाडांवर शिंपडा.