लोणचं आवडतं? मग बिंधास्त खा लिंबाचं लोणचं, 6 फायदे- जेवणातही येईल रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2022 09:50 AM2022-09-18T09:50:40+5:302022-09-18T09:55:02+5:30

जेवायला बसलं की ताटात एक तरी लोणच्याची फाेड असायलाच पाहिजे, त्याशिवाय जेवण कसं पुर्ण झाल्यासारखं वाटतच नाही, अशी खवय्ये आणि लोणचेप्रेमी मंडळी अनेक असतात.

पण बऱ्याचदा आंब्याच्या लोणच्यात मीठ, तेल जास्त प्रमाणात असल्याने डॉक्टर नेहमीच असे लोणचे कमी प्रमाणात खाण्याचा सल्ला देतात. त्यात बीपी, सांधेदुखी असा त्रास असणाऱ्या मंडळींना तर हा सल्ला अवश्य दिला जातोच.

म्हणूनच जर लोणचं खायचंच असेल, तर लिंबाचं खा.. कारण आंब्याच्या लोणच्यापेक्षाही मुरलेलं लिंबाचं लोणचं अधिक पौष्टिक आणि गुणकारी असतं, असं तज्ज्ञ सांगतात.

लिंबाच्या लोणच्यात असणारे गुणधर्म रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करतात. त्यामुळे अधिक उत्साही, उर्जादायी वाटते. पण त्याचाही अतिरेक करू नये. रोजच्या जेवणात मुरलेल्या लिंबाच्या लोणच्याच्या २ ते ३ फोडी असणं पुरेसं ठरतं

लिंबाच्या लोणच्यातून लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे घटक मिळतात. हाडे ठिसून होण्याची समस्या वृद्ध लोकांमध्ये आणि महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येते. त्यामुळे त्यांनी लिंबाच्या लोणच्याची एखादी तरी फोड नेहमीच खावी.

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम हे घटकही लिंबाच्या लोणच्यातून मिळतात.

तोंडाची चव गेली असेल, अन्नावरची वासना उडाली असेल तर लिंबाच्या लोणच्याची फोड खायला द्यावी. त्यामुळे तोंडाला चव येण्यास मदत होते.

लिंबाच्या लोणच्यातले व्हिटॅमिन बी रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनक्रिया वाढविण्यास मदत करते. तसेच लिंबाच्या लोणच्यामध्ये ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही मोठ्या प्रमाणात असतात.

गरोदर महिलांना सुरुवातीला मळमळ, उलटी असा त्रास होतो. काही खावंसं वाटत नाही. त्यांच्यासाठीही लिंबाचं लोणचं खाणं फायद्याचं ठरू शकतं.