लग्नापूर्वी जोडप्यानं कोणत्या मेडिकल टेस्ट करायलाच हव्यात? संसारातले भविष्यातले धोके टाळा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2022 04:23 PM2022-07-06T16:23:31+5:302022-07-06T16:35:45+5:30

१. लग्नापुर्वी जशी उपवर मुलामुलींची जन्मपत्रिका पाहिली जाते, तशीच आता एकमेकांची आरोग्य पत्रिका बघण्याचीही गरज आहे. आजकाल तरुण मुला- मुलींच्या आरोग्याच्या समस्याही इतक्या वाढल्या आहेत की भविष्यातील धोके टाळण्यासाठी लग्नापुर्वी वेगवेगळ्या आरोग्य चाचण्या दोघांनीही करणे गरजेचे झाले आहे.

२. त्यामुळेच लग्न करण्यापुर्वी दोघांनीही कोणत्या चाचण्या केल्या पाहिजेत, त्याविषयीची ही माहिती.

३. लग्नापुर्वी स्वत:ची आणि भावी जोडीदाराची कम्प्लिट ब्लड काऊंट टेस्ट एकदा करून घ्या. यालाच आपण CBC Test म्हणतो. यातून वेगवेगळे आजार, डिसऑर्डर्स याबाबत माहिती मिळते. लग्नापुर्वी एकमेकांचा रक्तगट माहिती असणेही गरजेचे आहे. कारण काही रक्तगट एकमेकांविरोधी असतात. आणि त्यामुळे भविष्यात गर्भधारणा होण्यास अडचणी येऊ शकतात.

४. लग्नानंतर दोघांमध्येही अपत्यप्राप्ती होण्याच्या दृष्टीने काही प्रॉब्लेम्स नाहीत ना, हे जाणून घेण्यासाठी fertility टेस्ट केली जाते. जर तशा काही अडचणी असतील, तर वेळीच त्यावर समोपचाराने काही तोडगे काढता येतात.

५. मुलाच्या किंवा मुलीच्या कुटूंबात काही अनुवंशिक आजार तर नाहीत ना, हे समजण्यासाठी जेनेटिक मेडिकल हिस्ट्री जाणून घेण्यात येते. यामुळे आपल्या पार्टनरला भविष्यात कोणकोणत्या आजारांचा धोका आहे, त्याची आधीपासूनच काळजी कशी घ्यावी, हे यातून स्पष्ट होते.

६. HIV आणि STD यासारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका असताेच. हा धोका टाळण्यासाठी याबाबतच्या चाचण्या करून घेणे, कधीही हितकारक ठरते.

७. थॅलेसिमिया या आजाराचा धोका आपल्या होणाऱ्या बाळाला तर नसेल ना, हे जाणून घेण्यासाठी होणाऱ्या पती- पत्नींनी या आजारासंबंधी टेस्ट करून घ्यावी.

८. आजकाल कामाचा ताण, स्पर्धा यामुळे प्रत्येकाला कोणता ना कोणता मानसिक ताण असतोच. मानसिक ताण असणं वेगळं आणि ताण अति झाल्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडणं हे वेगळं. म्हणूनच आपल्या जोडीदाराचं मानसिक स्वास्थ्य कसं आहे, याबाबतच्या मेंटल हेल्थ टेस्टही करून घ्या.