लिंबू आणि संत्र्यांच्या साली फेकू नका, ‘असा’ करा वापर, घर दिसेल चकाचक - स्वच्छ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2024 07:52 PM2024-06-29T19:52:23+5:302024-06-29T20:17:59+5:30

Don’t Throw Those Orange & Lemon Peels Away : लिंबू आणि संत्र्याच्या साली फेकून देण्यापेक्षा घरच्या साफसफाईसाठी त्यांचा असा वापर करता येऊ शकतो...

शक्यतो आपण लिंबू आणि संत्री यांचा वापर केल्यावर त्यांच्या साली फेकून देतो. किचनमध्ये काही ना काही बनवताना लिंबू व संत्र्याचा वापर होतोच. लिंबू व संत्र्याचे दोन्हींचे रस काढून झाल्यावर साली फेकून देतो. पण या लिंबू व संत्र्याच्या साली फेकून न देता आपण यांचा पुन्हा वापर करु शकतो. या सालींचा काहीच उपयोग नाही असा विचार करुन आपण त्या कचऱ्याच्या डब्यांत फेकतो. पण याच सालींचा वापर करुन आपण घरातील साफ - सफाईची कामे अगदी सहज करु शकता. घराची साफसफाई करण्यासाठी आपण नेहमी महागड्या क्लिनर्स व डिटर्जन्टचा वापर करतो. परंतु असे करण्यापेक्षा आपण या लिंबू व संत्र्यांच्या सालींचा साफसफाईसाठी क्लिनर्स म्हणून वापर करु शकतो.

भांडी चमकवण्यासाठी या सालींचा वापर तुम्ही करु शकता. करपलेली भांडी किंवा तेलाचे डाग काढायचे असतील तर या साली त्या डागांवर घासा यामुळे भांड्यांवरील चिकट डाग निघून जातील. त्याचबरोबर भांड्याना नैसर्गिकरित्या सुवास देखील येईल.

केमिकल असलेले हार्श क्लिनर टाईल्सला हानिकारक ठरू शकतात. अशावेळी लिंबाच्या सालांची पेस्ट बनवून लादीवर जिथे डाग पडले आहेत तिथे लावून पाण्याने साफ करा. संगमरवरी आणि ग्रेनाइटच्या लाद्या साफ करण्यासाठी लिंबाची साले एकदम बेस्ट क्लिनिंग एजंट आहेत.

किचनमध्ये ठेवलेल्या डस्टबिनमधून खूपच दुर्गंध येत असेल तर लिंबाचे साल वापरून तुम्ही हा त्रास कमी करु शकता. यासाठी लिंबाची साले सुकवून ती कचऱ्याच्या डब्यात ठेवा किंवा मग लिंबाचा रसदेखील कचऱ्याच्या डब्यात शिंपडा यामुळंही दुर्गंधी कमी होईल.

एका भांड्यात पाणी टाकून त्यात लिंबाची साले टाका. त्यानंतर हे भांडे मायक्रोव्हेवमध्ये काही वेळ ठेवा. यातून निघणाऱ्या वाफेमुळं आतील घाण थोडी मोकळी होईल. त्यानंतर ओल्या फडक्याने त्याची सफाई करुन घ्या.

किचनमध्ये ठेवलेल्या मसाल्यांच्या डब्यांवर दमट हवामानामुळं घाण साचते. अशावेळी खूप मेहनत करुन हे डाग काढावे लागतात. त्यासाठीच लिंबाची साले फायदेशीर ठरु शकतात. पहिल्यांदा डब्बे काही वेळ गरम पाण्यात ठेवा. मग डिश लिक्विडमध्ये भिजवून ठेवा. नंतर थोड्यावेळाने लिंबाच्या सालांनी घासून घ्या. डागांबरोबरच दुर्गंधीदेखील गायब होईल.

पावसाळ्यात तुमच्या घरात डास, माशा आणि मुंग्यांचा त्रास होत असेल तर तुम्ही या सालींचा वापर करू शकता. यासाठी घराच्या दारं - खिडक्यांजवळ लिंबू आणि संत्र्याची साले ठेवा. या सालीच्या उग्र वासामुळे डास, माशा आणि मुंग्यां घरात येणार नाहीत.

लिंबू आणि संत्र्याच्या सालीचा वापर फर्निचर स्वच्छ करण्यासाठी आणि त्यावरील डाग काढून टाकण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. यासाठी फर्निचरवर जिथे डाग पडले आहेत त्या भागावर या साली घासून मग तो भाग पाण्याने स्वच्छ धुवावा.