1 चमचा जिऱ्याचे 8 फायदे; स्वयंपाकघरात फोडणीपलीकडे जिऱ्याचा करा 'असा' वापर; आहारातील उत्तम औषध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2022 06:12 PM2022-02-24T18:12:16+5:302022-02-24T18:23:24+5:30

स्वयंपाक करताना एक छोटा चमचा वापरले जाणारे जिरे किंवा जिरेपूड केवळ स्वादासाठीच नाहीतर आरोग्य जपण्यासाठीही महत्त्वाचे असतात. स्वयंपाकात केवळ चवीचाच विचार होत असल्यानं जिऱ्याच्या आरोग्यदायी फायद्यांकडे लक्षच जात नाही. एक चमचा जिरे चवीसाठी जितके महत्त्वाचे तितकेच आरोग्यासाठीही. जिऱ्याचे आरोग्यास होणारे फायदे समजून घेतले तर त्यांचा विविध आरोग्य समस्यांवर उपचार म्हणून वापर करण्याचं प्रमाण वाढेल हे नक्की!

वजन कमी करण्यासाठी जिरे फायदेशीर असतात. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी जिऱ्याचं पाणी उपयुक्त मानलं जातं. तज्ज्ञ सांगतात जिऱ्याच्या पाण्यात थोडा लिंबाचा रस घातल्यास वजन कमी होण्यास फायदा होतो. जिऱ्यातील औषधीय गुणधर्मावरचा अभ्यास सांगतो, की जिऱ्यांमध्ये कर्बोदकं आणि फॅट्सचं पचन करण्याची, चयापचय सुधारण्याची क्षमता असते. म्हणूनच वजन कमी करण्यासाठी जिरे चावून खाण्यचा/ जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.

हाडांच्या आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी जिरे महत्त्वाचे आहेत. जिऱ्यांमध्ये दाहविरोधी, सूजविरोधी गुणधर्म असतात. हाडं आणि सांध्यांसाठी जिऱ्याचं पाणी पिणं/ छोटा चमचाभर भाजलेले जिरे चावून खाणं किंवा जिऱ्याचं तेल लावणं याप्रकारे जिऱ्याचा उपयोग औषध म्हणून करता येतो. जिऱ्यामध्ये थाएमोक्विनोन नावाचा घटक असतो. यामुळे सांध्याचा दाह, सूज, वेदना कमी होतात.

मासिक पाळीत पोट दुखणं, उलट्या होणं यावर उपाय म्हणून जिऱ्याचा उपयोग केला जातो. मासिक पाळीच्या दिवसात रोज एक ग्लास जिऱ्याचं पाणी प्याल्यास मासिक पाळीतल्या वेदना कमी होतात.

जिऱ्यांचा फायदा आरोग्यासोबतच सौंदर्यासही होतो. त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारण्यासाठी जिऱ्याचा उपयोग केला जातो. निस्तेज त्वचा, त्वचेवरील सुरकुत्या यावर उपाय म्हणून जिऱ्याचं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जिऱ्यात ई जीवनसत्त्वं असतं. त्वचा उजळण्यासाठी, त्वचेसंबंधी आजारांवर उपाय म्हणून जिऱ्यांचा उपयोग होतो. जिऱ्याच्या तेलाचा उपयोग संसर्गापासून त्वचेचा बचाव करण्यासाठी होतो.

रक्तातील लोहाची कमतरता जिऱ्यामुळे भरुन निघते. जिऱ्यांमध्ये लोहाचं प्रमाण भरपूर असतं. लोहाच्या कमतरतेमुळे होणारे ॲनेमियासरखे आजार जिऱ्यामुळे बरे होतात. ॲनेमिया होण्याचा धोका जिऱ्याच्या योग्य सेवनानं टाळता येतो.

'नॅशनल सेंटर फाॅर बायोटेक्नाॅलाॅजी इन्फर्मेशन' या साइटवर प्रकाशित झालेला एक शोधनिंबंध सांगतो , की डायरिया, अपचन, पोटात गॅसेस होणं, फोट फुगणं या पचनाशी निगडित समस्यांमध्ये जिऱ्याचा अर्क उपयुक्त ठरतो. ताकात जिरे पूड टाकून ताक प्याल्यास पचनाच्या समस्या कमी होतात. 'इरिटेबल बाऊल सिंड्रोम' हा आतड्यांशी संबंधित आजारातील वेदना कमी होण्यासाठी जिऱ्याचा औषधासारखा उपयोग केला जातो.

जिऱ्यामध्ये ॲण्टिडायबिटीक गुणधर्म असतात. हे गुणधर्म रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतात. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी उपचार म्हणून तसेच मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिऱ्याच्या सेवनाला महत्त्व आहे..

जिऱ्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवणारा 'इम्यूनोमाॅड्युलेटरी' हा गुणधर्म असतो. जिऱ्यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. याचा फायदा शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवठा चांगला होण्यास होतो.

वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंत जिऱ्याचे औषधी उपयोग सांगितले जातात. जिऱ्याचं पाणी विशेष फायदेशीर मानलं जातं. ते तयार करण्याची पध्दत सोपी आहे. त्यासाठी एका भांड्यात एक ग्लास पाणी घ्यावं. पाण्यात 2 छोटे चमचे जिरे घालावेत. हे पाणी 5-7 मिनिटं उकळावं. पाणी पिवळं झालं की गॅस बंद करावा. पाणी कोमट होवू द्यावं आणि मग प्यावं.