फुलं इतकी महाग की तेवढ्या किमतीत येईल प्लॅट- बंगला-गाडी! पाहा जगातली सर्वाधिक महाग सुंदर फुलं... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 05:41 PM 2024-10-19T17:41:55+5:30 2024-10-19T17:59:51+5:30
8 most expensive flowers and trees in the world : The 8 most expensive flowers in the world : जगातील सर्वात महागड्या फुलांच्या किंमती तुम्हाला माहित आहेत का, ही फुलं इतकी महाग आहेत कारण... वेगवेगळे रंग, आकार, सुवास असणारी फुलं सगळ्यांनाच फार प्रिय असतात. फुलांच्या वेगवेगळ्या प्रकारानुसार त्याची किंमत लावली जाते. आजपर्यंत आपण जगात अनेक महागड्या वस्तू पाहिल्या असतील. पण रोजच्या वापरातील फुलांची इतकी महागडी किंमत आपण कधी ऐकलीच नसेल. जगातील काही फुलांच्या जाती अशा आहेत की त्यांची किंमत ऐकून आपल्याला आश्चर्याचा धक्काच बसेल. या फुलांच्या किंमती ऐकून 'ऐकावं ते नवलचं'... असं म्हणायची वेळ येणार हे मात्र नक्की...जगातली सर्वात महाग किंमतीला विकली जाणारी ही फुलं कोणती ते पाहूयात(Eight of the Most Expensive Flowers in the World).
१. कडूपुल फुल :- कडूपुल फुल याला 'अनमोल फुल' असे देखील म्हटले जाते. हे कॅक्टस प्रकारातील एक फुल आहे. हे फुल फक्त रात्रीच फुलते. या फुलाच्या बाबतीत सगळ्यात एक विशेष गोष्ट म्हणजे हे फुल ज्या झाडावर उगवते तिथून ते तोडले किंवा कापले जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे हे कडूपुल फुल आपल्या सुगंधाने वेड लावू शकते आणि ते फुलल्यानंतर काही तासांतच सुकते.
२. केशर फुल :- केशरचा वापर आपण अनेक पदार्थांमध्ये रंग आणि चव यासाठी केला जातो. जांभळ्या रंगाच्या या नाजूक फुलांच्या परागकणांपासून केशर तयार केले जाते. सुमारे ८० हजार केशर फुलांपासून केवळ ५०० ग्रॅम इतकेच केशर मिळते. केशरच जर बाजारांत इतके महाग किंमतीत विकले जात असेल तर त्याच्या फुलांची किंमत किती असेल याचा अंदाज न लावलेलाच बरा आहे. केशर फुल इतके मौल्यवान आहे की त्याची किंमत ३ लाख रुपये प्रति किलो ग्रॅमपर्यंत असू शकते.
३. चंदनाचे फुलं :- चंदनाच्या लाकडाप्रमाणेच चंदनाचे फुल देखील तितकेच सुवासिक आणि महाग असते. चंदनाच्या झाडाचे लाकूड हे आपल्याकडे सगळ्यात महाग लाकूड म्हणून विकले जाते. चंदनाच्या लाकडाला येणारा सुगंध यामुळेच ते किंमतीने फारच महाग असते. चंदनाच्या एका झाडाला संपूर्णपणे वाढून परिपक्व होण्यासाठी भरपूर वर्षांचा कालावधी जावा लागतो. यासाठीच चंदनाचे लाकूड फार महाग विकले जाते यासोबतच त्याची फुलं देखील तितकीच महाग असतात.
४. शेन्झेन नोंगके ऑर्किड :- या फुलाची किंमत १६. ५४ कोटी इतकी आहे. हे फूल अनेक कृषी शास्त्रज्ञांनी मिळून तयार केलेले मानवनिर्मित फुल आहे. शेन्झेन नोंगके विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी ८ वर्षांच्या मेहनतीनंतर हे फूल तयार केले आहे. या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ४ ते ५ वर्षातून एकदाच फुलते आणि जेव्हा फूल येते तेव्हाच त्याचा लिलाव केला जातो.
५. ज्युलिएट रोज :- ज्युलिएट रोजची किंमत अंदाजे १३० कोटी इतकी आहे. काही वेबसाइट्सवर या फुलाची किंमत ५ दशलक्ष डॉलर्स इतकी देखील आहे. हे फ्लोरिस्ट डेव्हिड ऑस्टिन यांनी हे फुल तयार केले आहे आणि हे फूल तयार करण्यासाठी त्यांना १५ वर्षे लागली. अनेक दुर्मिळ फुलांच्या जाती एकत्र करून हे फूल तयार केले आहे. सर्वात पहिल्यांदा हे फुल २००६ मध्ये विकले गेले होते.
६. अगरवूड :- अकिलारियाच्या झाडापासून मिळणारे लाकूड अगरवूड या नावाने ओळखले जाते. या लाकडापासून अत्तर आणि परफ्युम बनवला जातो. लाकूड कुसल्यानंतर त्याचा वापर अत्तर बनवण्यासाठी केला जातो. एवढेच नाही तर अगरवूडच्या लाकडाच्या राळेपासून ओड तेलही मिळवले जाते. हे तेल सेंटमध्ये वापरले जाते. एवढे मौल्यवान असल्याने अगरवूडला वूड ऑफ गॉड्स म्हणजेच देवाचे लाकूड असे म्हणतात.
७. किनाबालु ऑर्किड :- किनाबालु ऑर्किड हे जगातील सर्वात महागडे ऑर्किड जातीचे फुल आहे. या फुलाच्या पाकळ्या पिवळ्या, जांभळ्या आणि लाल रंगाच्या तर देठ हिरव्या रंगाचा असतो. हे फुल फक्त मलेशियाच्या किनाबालु नॅशनल पार्कमध्ये आढळते म्हणून याचे नाव किनाबालु ऑर्किड असे आहे. भारतीय रुपायानुसार या फुलाची किंमत सुमारे ४.९६ लाख रुपये इतकी आहे. या फुलाला बहर यायला बरीच वर्षे लागतात.
८. ग्लोरिओसा लिली :- ग्लोरिओसा लिली हे फुल एखाद्या धगधगत्या आगीच्या ज्वाळेप्रमाणेच दिसते म्हणून याला 'फ्लेम लिली' असेही म्हटले जाते. या फुलांच्या पाकळ्या हलक्याशा मागे झुकलेल्या आणि गडद लाल - पिवळ्या रंगाच्या असतात. ही फुल उमलून येण्यासाठी २ ते ४ वर्षांचा कालावधी लागतो, तसेच ते उमलल्यानंतर त्यांची खूप काळजी घ्यावी लागते.