उद्यापासून पहाटे लवकर उठायचंय? ६ टिप्स- गजर होण्यापूर्वी जाग येईल-तडक लागाल कामाला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2024 05:01 PM2024-11-29T17:01:35+5:302024-11-29T17:14:33+5:30

Adopt These 6 Habits To Wake Up Early In Morning In Winter : Best Morning Routine How To Wake Up Early During Winter Season : ऐन थंडीच्या दिवसांत उबदार अंथरुणातून बाहेर यावेसेच वाटत नाही, तर करा हे सोपे उपाय...

हिवाळ्यात वातावरणातील वाढत्या गारव्याने आपल्याला चांगली झोप लागते. थंडीच्या दिवसांत सकाळी (Best Morning Routine How To Wake Up Early During Winter Season) खूप गारठा असल्याने चादर, ब्लँकेट्स मधून बाहेर येऊच नये असे वाटते. या कुडकुडणाऱ्या थंडीत अंगावर उबदार ब्लँकेट्स, शाल घेऊन अंथरुणात तासंतास झोपावेसे वाटते. अशा परिस्थितीत, घड्याळाचे कितीही गजर झाले किंवा मोबाईलचे अलार्म सारखे स्न्यूज केले तरी झोप काही पूर्ण होतच नाही. अशा या ऐन थंडीच्या दिवसांत उबदार अंथरुणातून बाहेर येणे हा खूप मोठा टास्कच असतो. थंडीच्या दिवसांत कितीही ठरवले तरीही लवकर जाग येत नाही, आणि आलीच तर अंथरुण सोडावेसे वाटत नाही. अशावेळी काही ट्रिक्स लक्षात ठेवून आपण थंडीच्या दिवसांत देखील लवकर उठू शकतो.

हिवाळ्याच्या दिवसांत शक्यतो वेळेवर झोपण्याची आणि उठण्याची सवय स्वतःला लावावी. रात्री लवकर झोपावे म्हणजे सकाळी लवकर जाग येते. दररोज एकाचवेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. यामुळे तुमचे शरीर रुटीनमध्ये येईल आणि तुम्हाला सकाळी लवकर उठणे सोपे जाईल.

रात्री झोपण्याआधी किमान अर्ध्या तासांसाठी कोणत्याही प्रकारची स्क्रिन सतत पाहणे टाळावे. रात्री लवकर झोप यावी म्हणून काहीजणांना मोबाईल, लॅपटॉप यांसारख्या वस्तू वापरण्याची सवय असते. परंतु असे न करता झोपण्यापूर्वी स्क्रिन पाहणे टाळावे.

झोपण्यापूर्वी झोप येण्यासाठी बेडरुम किंवा जिथे झोपता त्या खोलीचे वातावरण झोपण्यासाठी योग्य असे करुन घ्या. झोपण्यापूर्वी तुमच्या खोलीचे तापमान थंड ठेवा, खोली अंधारलेली असावी आणि वातावरण शांत असावे. सकाळी उठल्यानंतर लगेचच खोलीचे पडदे उघडा किंवा प्रकाशाच्या ठिकाणी जा . हे तुमच्या शरीराला सूचित करते की दिवस सुरू झाला आहे आणि तुम्ही जागे आहात, यामुळे झोपेतून जागे होण्यास अधिक मदत मिळते.

सकाळी उठल्यानंतर व्यायाम करणे हा दिवसाची सुरुवात करण्याचा उत्तम मार्ग आहे. हे केवळ तुमच्या शरीरालाच ऊर्जा देत नाही तर तुमचे मनही ताजेतवाने आणि उत्साही बनते. सकाळी उठल्यानंतर हलका व्यायाम केल्याने शरीरात ऊर्जा वाढते आणि झोप दूर होते.

सकाळी उठल्यानंतर काहीतरी इंटरेस्टिंग किंवा तुमच्या आवडीचे काम करण्यासाठी वेळ राखून ठेवावा. जसे की नवीन पुस्तक वाचणे, योगा करणे किंवा मित्रांसोबत कॉफी पिणे. ध्येय निश्चित करा आणि ते साध्य करण्यासाठी सकाळी लवकर उठा. आपल्या आवडीचे काहीतरी इंटरेस्टिंग काम करण्याच्या हेतूने आपण लवकर अंथरुणातून उठू.

अलार्म बेडपासून दूर ठेवा जेणेकरून तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडावे लागेल. जेव्हा तुमचा अलार्म वाजतो आणि तो तुमच्या पलंगापासून दूर असतो, तेव्हा तो बंद करण्यासाठी तुम्हाला अंथरुणातून बाहेर पडावे लागेल. ही एक छोटी शारीरिक क्रिया आहे जी तुम्हाला झोपेतून जागे होण्यास मदत करते.