अमिताभ आणि जया बच्चन : नवरा बायको म्हणून त्यांची केमिट्री सांगते संसाराची काही सूत्रं By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 06:33 PM 2021-07-21T18:33:25+5:30 2021-07-21T19:07:33+5:30
अमिताभ आणि जया बच्चन यांनी नवरा बायकोचं नातं निभावताना या नात्यात काय असावं, काय नसावं, काय घडावं, काय टाळावं याचे नकळतपणे धडे घालून दिले आहेत. ते कोणते जोडी कशी असावी तर ‘अमिताभ आणि जया बच्चनसारखी’ असं बॉलिवूडमधे आणि बॉलिवूडबाहेर बोललं जायचं. त्यांच्या लग्नाला जून महिन्यात 48 वर्षं पूर्ण झालीत. पण आजही आदर्श जोडप्याचं उदाहरण म्हणून अमिताभ आणि जया बच्चन यांचं नाव घेतलं जातं.
दोघांचीही भिन्नं व्यक्तिमत्त्वं, दोघांच्या भोवतीचं प्रसिध्दीचं वलय वेगळं, दोघांची लोकप्रियता एकाच मापानं न मोजता येणारी . तरीही नात्याचा जेव्हा विचार होतो तेव्हा ही दोघं आपलं वलय बाजूला ठेवून एकमेकात विरघळल्यासारखीच दिसतात.
अभिमान प्रदर्शित होण्याच्या काही महिने आधी अभिताभ आणि जया यांचं लग्न झालं होतं. अभिमानची स्टोरी त्यांच्या आयुष्यात घडते की काय अशा शंका कित्येकदा व्यक्त केल्या गेल्या, त्यांच्या नात्यात वादळं आल्याची चर्चा बाहेर झाली. पण दोघांचं नातं या चर्चेला पुरुन उरलं. त्यांनी या चर्चांची ना दखल घेतली ना त्यावर काही विधान केलं.
अमिताभ आणि जया बच्चन यांनी नवरा बायकोचं नातं निभावताना नात्यात काय असावं, काय नसावं, काय घडावं, काय टाळावं याचे नकळतपणे त्यांनी धडे घालून दिले आहेत.
नवरा मृत्यूचा दारात असताना, डॉक्टरांनी अमिताभ यांना ‘क्लिनिकली डेड’ असं घोषित केलेलं असताना जया बच्चन खचल्या नाहीत. प्रार्थना आणि प्रेमाच्या ताकदीवर त्यांचा विश्वास होता. त्यामुळे काळ , प्रसंग कितीही भयंकर आणि अवघड असला तरी खंबीर रहाणं, शांत राहून निर्णय घेणं किती आवश्यक आहे हेच जया बच्चन यांनी अमिताभ यांना कुलीच्या सेटवर झालेल्या अपघातानंतर उद्भवलेल्या परिस्थितीत दाखवून दिलं. आजही त्या जेव्हा मुलाखतींमधे त्या प्रसंगाची आठवण सांगतात तेव्हा नवरा बायकोनं आयुष्यातल्या कठीण काळात खंबीर राहाण्याला पर्याय नसल्याचं आवर्जून सांगतात.
अमिताभ यांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करायचे आणि बाहेर त्यांचे नाव वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबत जोडलं जायचं. त्याच्या बातम्या व्हायच्य्ता. पण जया यांना नवरा म्हणून अमिताभ यांच्यावर पूर्ण विश्वास होता. आपला नवरा कोणत्या क्षेत्रात काम करतोय, तिथे काय चर्चा होतात, काय होवू शकतात याची त्यांना पूर्ण कल्पना असल्यानं त्यांनी त्याची झळ ना स्वत:ला बसू दिली ना नात्याला.नवरा बायकोच्या नात्यात इतर कशापेक्षाही जया यांच्या मते विश्वासच जास्त महत्त्वाचा असतो. एकमेकांवर विश्वास असणं आणि एकमेकांचा विश्वास जपणं दोन्हीही आवश्यक असं त्या म्हणतात.
कुटुंबाची जबाबदारी नीट पार पाडता यावी म्हणून जया यांनी चित्रपट करिअरमधे उमेदीच्या काळात माघार घेतली. घर, मुलं, नातं, जबाबदार्या यांना महत्त्व दिलं. पण घर जस बायकोचं तितकंच नवर्याचही, ही भावना त्यांनी अमिताभ यांच्यात रुजवली. म्हणूनच कामात व्यग्र असतानाही अमिताभ यांनी घराकडे, मुलांकडे लक्ष दिलं. वडील आपल्या वाट्याला आलेच नाही असं मुलांना कधीच वाटलं नाही. आणि घरात फक्त जयाचं चालतं ही भावना अमिताभ यांच्या मनात आली नाही. घराच्या बाबतीत पुढाकार जरी एकाला घ्यावा लागला तरी जबाबदारी दोघांनीही समसमान घ्यावी असं अमिताभ आणि जया यांना वाटतं. कारण त्यांच्यामते यामुळेच नवरा बायको यांच्यातील कोणीच घरापासून, नात्यापासून तुटत नाही .
घरासाठी स्वत:चं करिअर बाजूला ठेवणार्या जया यांच्या भूमिकेबद्दल अमिताभ यांनी नवरा म्हणून कायम आदर बाळगला. पण कायम त्यागाची भूमिका बायकोनंच घ्यावी असंही अमिताभ यांनी केलं नाही. सन 2000 मधे जया यांना राजकारणात यावंसं वाटलं तेव्हा अमिताभ यांनी त्यांना पूर्ण सहकार्य केलं, पाठिंबा आणि प्रोत्साहन दिलं. नवरा बायकोच्या नात्यात त्याग आणि पाठिंबा असेल तर नातं टिकतं. नातं सांभाळूनही व्यक्ती म्हणून मोठं होता येतं हे अमिताभ आणि जया यांनी दाखवून दिलं.
वय झालं तरी नवरा बायकोच्या नात्यातला रोमान्स, तारुण्य कायम राहिलं पाहिजे ही भूमिका अमिताभ आणि जया या दोघांनीही जपली. एकमेकांबद्दल व्यक्त होणं, संधी मिळेल तेव्हा एकमेकांबद्दल जाहीर प्रेम, आदर व्यक्त करणं हे दोघांनीही आवर्जून केलं. ते म्हणतात हे केलं म्हणूनच आमची नात्यातली संवेदनशीलता, हळवेपणा अजूनही तसाच टिकून आहे.