दीपिका पदुकोण म्हणते मेकअपची पुटं नकोत, सादगीतली नॅचरल ब्युटी प्यारी! त्यासाठी तिचे हे उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2021 06:02 PM 2021-08-05T18:02:46+5:30 2021-08-05T18:18:52+5:30
दीपिका पदुकोण म्हणते की सौंदर्य हे तात्पुरतं नसावं. सौंदर्य नैसर्गिकपणे जपलं तर ते टिकून राहातं. सौंदर्य जपण्यासाठीचे नैसर्गिक उपाय सहज आणि सोपे आहेत. फक्त ते करण्यात शिस्त आणि सातत्य हवं. दीपिका पदुकोण एका मुलाखतीत म्हणते की, सुंदर दिसण्यासाठी सौंदर्य उत्पादनांच्या मागे पळण्याची गरज नसते. मी माझं सौंदर्य जपताना ब्युटी प्रोडक्सपेक्षा आरोग्यदायी दिनचर्या, त्वचा जपण्याबाबतची शिस्त, पोषक आहाराचा नियम आणि नियमित व्यायामाची सवय या चार गोष्टींना महत्त्व देते.’ नितळ आणि नैसर्गिक सौंदर्य हवं असेल तर या चार गोष्टींना बगल देऊन सुंदर होता येणार नाही असं दीपिका म्हणते.
केसांचं सौंदर्य जपताना दीपिका केसांच्या पोषणाचा जास्त विचार करते. केस चमकदार दिसण्यासाठी, दाट होण्यासाठी दीपिका रोज खोबरेल तेलानं केसांना मसाज करते.
त्वचेचं सौंदर्य त्वचेच्या आरोग्यावर अवलंबून असतं आणि त्वचेचं आरोग्य जपण्यासाठी आपण त्वचेची कशी काळजी घेतो यावर अवलंबून असतं, असं दीपिका म्हणते. रोज चेहर्याला मॉश्चराइज करणं, सनस्क्रीन लावणं आणि कितीही हलका मेकअप केला तरी झोपण्यापूर्वी क्लीन्जींग करण्याला दीपिका महत्त्व देते.
त्वचा चमकदार दिसण्यासाठी दिवसभर आपल्या शरीरात आतून ओलावा हवा. त्यासाठी पुरेसं पाणी प्यायला हवं. यासोबतच संतुलित आहार आणि पुरेशी झोप महत्त्वाची असते असं दीपिका म्हणते. आहारातून पोषण आणि पुरेशी झोप झाली की त्वचा आणि शरीराला आपली झालेली हानी भरुन काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो असं दीपिका म्हणते.
दीपिका म्हणते छान दिसण्यासाठी खूप ब्युटी प्रोडक्टस वापरण्याची गरज नाही. कमी पण चांगल्या गुणवत्तेची सौंदर्य उत्पादनं वापरण्याला महत्त्व द्यायला हवं.
कितीही प्रयत्न केला तरी चेहेर्यावर नैसर्गिक सौंदर्याची चमक येण्यासाठी मेकअप पुरेसा नाही यावर दीपिकाचा विश्वास आहे. आपला आहार, पाण्याचं प्रमाण, त्वचेचे काळजी घेण्याची आपली सवय आणि व्यायाम या चार गोष्टी पाळल्या तर चेहेरा चमकदार होतो ही खात्री दीपिका स्वत:च्या अनुभवातून देते.
आपल्या सौंदर्यात फिटनेसची भूमिका महत्त्वाची असते. फिटनेस हा व्यायामासोबत खाण्याच्या आरोग्यदायी सवयीतून जपायला हवा. आपली चयापचय क्रिया योग्य असली तर वजन नियंत्रित राहातं हे सांगताना दीपिका स्वत:चा अनुभव सांगते. ती म्हणए मी दर दोन तासांनी थोडं थोडं खाते. यामुळे त्वचेलाही पोषण मिळतं आणि मला कामासाठी ऊर्जा मिळते.
दीपिका म्हणते नैसर्गिक सौंदर्य तात्पुरत्या उपायांनी मिळत नाही. ते मिळवण्यासाठी आहार-विहार, त्वचेची काळजी यात शिस्त आणि सातत्य हवं. ते असलं तर सौंदर्य हे तात्पुरतं न राहाता टिकून राहातं.