केस वाढतील भराभर- होतील दाट, त्वचाही दिसेल सुंदर- तरुण! खा फक्त ३ पदार्थ रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2024 02:01 PM2024-07-08T14:01:03+5:302024-07-08T18:41:01+5:30

हल्ली प्रदुषण, धूळ, ऊन, कामाची दगदग, ताण, आहारातून पुरेसं पोषण न मिळणे यामुळे कमी वयातच तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर त्वचा आणि केसांच्या समस्याही वाढतच चालल्या आहेत.

मेनोपॉजच्या आसपास असणाऱ्या महिलांना तर त्यांच्या शरीराप्रमाणेच केस आणि त्वचा या दोन्हींच्या समस्या खूपच जास्त जाणवू लागतात. त्याच कमी करण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी विशेष माहिती दिली आहे. आणि त्यासाठी कोणते अन्नपदार्थ खावे, हे सुचवलं आहे.

ऋजुता यांनी केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी आहारात जे पदार्थ घ्यायला सांगितले आहेत, ते सगळ्याच वयोगटातील महिलांसाठी उपयुक्त ठरणारे आहेत. त्यामुळे ते पदार्थ कोणते ते पाहा आणि ते नियमितपणे तुमच्या आहारात घेत चला. यामुळे त्वचा आणि केस यांच्या समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.

हे पदार्थ जर आहारात असतील तर वाढत्या वयानुसार त्वचेवर येणारे ॲक्ने, पिगमेंटेशन, डोळ्यांभोवतीची काळी वर्तुळे असा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होईल.

त्यांनी सांगितलेला सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे अळीव आणि खोबरं घालून केलेले लाडू. या लाडूंमध्ये लोह, व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते.

दुसरा पदार्थ म्हणजे भात. थोडासा भात नियमित खाणे केस आणि त्वचेसाठी चांगले असते. ज्या भागात भात जास्त प्रमाणात खाल्ला जातो, त्या भागातील लोकांचे केस आणि त्वचा चांगली असते, असं ऋजुता सांगतात.

तिसरा पदार्थ आहे घरी केलेलं दही किंवा त्या दह्यापासून केलेलं ताक. दही किंवा ताक घरी तयार केलेलं असेल तर आहारातील पोषणमुल्ये शरीरात व्यवस्थित शोषून घेण्यास मदत होते.

त्वचा आणि केस चांगले ठेवायचे असतील तर कॉफी आणि चहाचे प्रमाण कमी करा. कारण त्यामुळे आहारातील लोह किंवा इतर पोषण मुल्ये शरीरात व्यवस्थित शोषून घेतली जात नाहीत. शरीरातील लोह वाढल्यास त्वचेवर आपोआपच छान ग्लो येतो.