पहिला पाऊस झाल्यानंतर लावली तर उत्तम रुजतात ही 7 रोपं, मौसम बेस्ट-निवडा रोपं परफेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2022 08:14 PM2022-07-19T20:14:25+5:302022-07-19T20:22:39+5:30

१. सध्या मस्त पावसाला सुरुवात झाली आहे. जवळपास रोजच पाऊस बरसत आहे. त्यामुळे आपल्या बगिच्यातल्या झाडांमध्येही सध्या एक वेगळाच टवटवीतपणा आलेला दिसतोय..

२. गार्डनिंगची आवड असेल आणि तुमच्या बागेत काही रोपटी लावायचा विचार करत असाल, तर सध्याचा काळ त्यासाठी एकदम उत्तम आहे. कारण काही रोपटी अशी असतात जी एरवी लावण्यापेक्षा पावसाळ्यात लावली तर ती अधिक जोमाने बहरून येतात.

३. कारण पावसाच्या पाण्याद्वारे रोपट्यांना नैसर्गिक स्वरुपात काही खनिजं मिळतात. त्यातून त्यांचं जे पोषण होतं, त्या पातळीचं पोषण नंतर आपण त्यांना कितीही पाणी दिलं आणि काळजी घेतली तरी मिळत नाही. म्हणूनच काही राेपटी लावण्यासाठी पावसाळा हा सगळ्यात उत्तम काळ मानला जातो.

४. कन्हेराचं रोपटं लावायचं असेल तर हा काळ सगळ्यात चांगला आहे. खरंतर कन्हेराला खूप पाणी लागत नाही. तसंच त्या झाडाला भरपूर उन्हात ठेवावं लागतं. पण हे झाड जेव्हा तुम्ही पावसाळ्यात लावता, तेव्हा ते अधिक जोमाने खुलून येतं.

५. मोगऱ्याचं रोप किंवा मोगऱ्याचा कलम लावायचा असेल तरी तो याच दिवसांत लावावा. साधारण थंडी संपून जेव्हा ऊन वाढू लागतं तेव्हा मोगऱ्याला कळ्या यायला सुरुवात होते आणि एप्रिल- मे या दिवसांत तर मोगरा अगदी बहरून जातो. त्यामुळे त्या सिझनमध्ये मोगऱ्याला भरपूर फुलं येऊन त्यांचा धुंद सुवास अनुभवायचा असेल तर सध्याच्या पावसाळ्याच्या दिवसांत मोगरा लावा.

६. मधुमालती या वेलाचंही तसंच. एकच झाड पण त्याला येणारी लाल, पांढरी, गुलाबी फुलं आणि त्यांचा सुवास मन प्रसन्न करणारा असतो.मधुमालतीला हिवाळ्यात- उन्हाळ्यात खूप बहर येतो. पण तोपर्यंत तिची चांगली वाढ होण्यासाठी याच दिवसांत मधुमालती लावा. हा वेल खूप उंच चढतो. त्यामुळे बगिच्यात मंडप घालण्यासाठी किंवा गेटवर महिरप घालण्यासाठी मधुमालती लावली जाते. तुम्हालाही अशा पद्धतीने मधुमालती भरपूर वाढवायची असेल, तर तिच्या लागवडीसाठी पावसाळा योग्य आहे.

७. मधुमालती, मोगरा यांच्याप्रमाणेच छोट्याशा पांढऱ्या सुवासिक फुलांचं झाड म्हणजे मधुकामिनी. तिचं रोपही याच दिवसांत अंगणात लावून टाका.

८. जाई- जुई- चमेली- सायली या वेलींचा बहराचा काळ म्हणजे हिवाळा. त्यामुळे आताच त्यांची रोपं लावा. म्हणजे तोपर्यंत त्यांची चांगली वाढ होऊन अंगणात त्यांचा छान सुवास दरवळेल.

९. जास्वंद, गुलाब ही फुलं कोणत्याही ऋतूत येतात. त्यामुळे ही रोपं उन्हाळा सोडून तुम्ही कधीही लावू शकता. पावसाळ्यात लावली तर आणखी उत्तम.