ऋतू बदलामुळे त्वचा कोरडी झाली? गुलाबपाण्याचा 'असा' वापर करा, त्वचेसाठी ठरेल वरदान By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2024 11:26 AM 2024-02-08T11:26:02+5:30 2024-02-08T11:33:01+5:30
आता हळूहळू वातावरणात बदल होत आहे. सकाळी आणि रात्री वातावरणात गारवा असला तरी दुपारच्यावेळी ऊन तापत आहे. अशा गरम- थंड- कोरड्या वाऱ्याचा परिणाम त्वचेवर होतो. आणि ऋतू बदल होत असतानाच्या या काळात त्वचा कोरडी पडल्यासारखी वाटते.
अशा कोरड्या पडलेल्या त्वचेसाठी गुलाबपाणी हे खरोखरच वरदान आहे. गुलाबपाणी नियमितपणे त्वचेला लावलं तर त्याचे त्वचेला खूप फायदे होतात. ते नेमके कोणते आणि त्वचेला गुलाबपाणी लावण्याची योग्य पद्धत कोणती ते पाहूया..
रात्री झोपण्याच्या आधी तुम्ही चेहऱ्याला गुलाब पाणी लावू शकता. किंवा सकाळी उठल्यानंतर चेहरा धुतला की इतर कोणतंही कॉस्मेटिक्स लावण्याआधी चेहऱ्याला गुलाब पाणी लावा. त्यानंतर तुमचं इतर स्किन केअर रुटीन करा.
गुलाबपाणी चेहऱ्याला नियमितपणे लावल्यास चेहरा हायड्रेटेड राहतो. त्वचा कोरडी होत नाही. त्यामुळे त्वचेवर अकाली सुरकुत्या येत नाहीत.
गुलाबपाण्यामध्ये भरपूर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे त्वचा तरुण, तजेलदार ठेवण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.
सनबर्नचा त्रास झाला असेल तर त्यावर गुलाबपाणी लावा. त्वचेला थंड वाटून त्रास कमी होईल.
गुलाब पाणी हे नॅचरल टोनर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे त्वचेचा घट्टपणा टिकवून ठेवण्यासाठी गुलाबपाणी नियमितपणे लावावे.
गुलाबपाण्यामध्ये ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे ॲक्नेचा त्रास असेल तर काही दिवस नियमितपणे गुलाबपाणी लावून पाहा. त्रास कमी होईल.