Bigg Boss 15 Winner : कोण आहे बिग बॉस १५ ची मराठमोळी विजेती तेजस्वी प्रकाश? 'या' अभिनेत्यांसह अफेअरमुळे होती चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2022 12:44 PM2022-02-01T12:44:24+5:302022-02-01T13:06:08+5:30

Bigg Boss 15 Winner : तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं आणि कालांतराने तीही इंजिनियर झाली. तिनं मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली.

बिग बॉस 15 (Bigg Boss 15 Winner) या रिअॅलिटी शोची विजेती सौंदर्यवान अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ही ठरली . बिग बॉस 15 मध्ये, तेजस्वी प्रकाशसह करण कुंद्रा आणि प्रतीक सहजपाल यांनी पहिल्या तीनमध्ये प्रवेश केला. पण तेजस्वीने दोघांचाही पराभव करत सीझन 15 ची ट्रॉफी मिळवली. तेजस्वी प्रकाशची थेट स्पर्धा प्रतीक सहजपाल यांच्याशी होती. तेजस्वी आणि प्रतीकने टॉप 2 मध्ये प्रवेश केला. मात्र मतांच्या कमतरतेमुळे प्रतीकला शो गमवावा लागला. प्रतीक हा या शोचा फर्स्ट रनर अप ठरला आहे. (Bigg Boss 15 Winner)

ग्रँड फिनालेमध्ये सलमान खानने दोन फायनलिस्टचा हात धरला आणि विजेत्याचे नाव घेतले. चाहते तेजस्वीचे विजयाबद्दल सतत अभिनंदन करत आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला तेजस्वी प्रकाश (Tejashwi prakas) यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगत आहोत.

तेजस्वी प्रकाशचा जन्म 10 जून 1992 रोजी जेद्दाह, सौदी अरेबिया येथे झाला. तिचे वडील प्रकाश वायंगणकर आणि भाऊ प्रतिक वायंगणकर हे इंजिनिअर आहेत. अशा स्थितीत शालेय शिक्षण पूर्ण करून तीही अभियांत्रिकीच्या रांगेत आली. तिला लहानपणापासूनच इंजिनिअर व्हायचं होतं आणि कालांतराने तीही इंजिनियर झाली. तिनं मुंबई विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनीअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली. पण काही काळानंतर तिनं आपले करिअर बदलण्याचा निर्णय घेतला.

तेजस्वी प्रकाशने अभियांत्रिकीची पदवी घेण्यासोबतच अभिनय विश्वात प्रवेश केला होता. जेव्हा ती टीव्हीवर दिसली तेव्हा ती फक्त 18 वर्षांची होती. तेजस्वीची पहिली मालिका '2612' आहे, जी 2012 मध्ये प्रसारित झाली होती. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये दिसली, ज्यात 'स्वरागिनी-जोडे रिश्ते का सूर', 'पेहेदार पिया की', 'सिलसिला बदलते रिश्तों का' सारख्या टीव्ही मालिकांचा समावेश आहे.

तेजस्वी प्रकाशने टीव्हीसोबतच अनेक रिअॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अभिनेत्रीची क्यूट स्टाइल प्रत्येक शोमध्ये पाहायला मिळाली, जी चाहत्यांना खूप आवडली आहे. तेजस्वीने 'फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी', 'किचन चॅम्पियन 5', 'कॉमेडी नाइट्स लाइव्ह' असे अनेक रिअॅलिटी शो केले आहेत. आता ती बिग बॉस 15 ची विजेतीही बनली आहे.

2017 च्या मध्यात अभिनेत्री तेजस्वी प्रकाशची मालिका 'पहरेदार पिया की' प्रसारित झाली. सुरुवातीला मालिकेवर प्रेक्षक खूप संतापले. कारण तेजस्वीचे लग्न अवघ्या 9 वर्षांच्या मुलाशी होताना दखवण्यात आले. ती कथा प्रेक्षकांना अजिबात आवडली नाही. कालांतराने ही मालिका बंद झाली.

तेजस्वी प्रकाशचे नाव अभिनेता शिवीन नारंगसोबत जोडले गेले होते. दोघेही 'खतरों के खिलाडी'मध्ये दिसले होते. इतकंच नाही तर दोघांची बाँडिंग चाहत्यांना खूप आवडली आहे. याच कारणामुळे त्यांच्या नात्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. मात्र, दोघेही नेहमी स्वत:ला एकमेकांचे चांगले मित्र मानतात.

आता तेजस्वी करण कुंद्राला डेट करत आहे. बिग बॉस 15 मध्येच दोघांची जवळीक वाढली होती.