सेलिब्रिटी काळे पाणी पितात, ते नेमके काय असते? हा पाण्याचा कुठला प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2022 03:37 PM2022-12-17T15:37:36+5:302022-12-17T16:12:07+5:30

Black Alkaline Water : सेलिब्रिटी रोजच्या जगण्यात ब्लॅक वॉटर म्हणजेच अल्कलाईन वॉटरचा आपल्या आहारात समावेश करतात.

शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी आपल्याकडील अनेक सेलिब्रिटीज व खेळाडू अल्कलाइन पाणी म्हणजेच काळे पाणी पिताना दिसतात. हे पाणी या सेलिब्रिटीजना खरंच निरोगी ठेवते का? हे काळे पाणी म्हणजे नेमकी काय भानगड आहे? चला तर मग जाणून घेऊया हे अल्कलाइन वॉटर म्हणजे नक्की काय आहे ? (Black Alkaline Water).

ब्लॅक वॉटरला अल्कलाइन वॉटर असे म्हटले जाते. या पाण्यामध्ये जास्त प्रमाणात क्षार असतात त्यामुळे याला क्षारयुक्त पाणी देखील म्हणतात. काळे पाणी हे सामान्य पाण्यापेक्षा रंगानेच नाही तर गुणधर्मांनीसुद्धा वेगळे आहे. व्यायाम केल्यानंतर किंवा जास्त घाम आल्यावर या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील पाण्याची कमतरता लगेच भरून निघते व डिहायड्रेटेड शरीराला लगेच हायड्रेटेड करता येते. शरीराला आवश्यक असणा-या ज्या पोषक तत्वांची पूर्तता सामान्य पाणी करते ते पोषक तत्व काळ्या पाण्यात जास्त असतात.

अमेरिकेच्या थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटीत केलेल्या रिसर्चनुसार, साध्या पाण्याऐवजी जर अल्कालाईन पाण्याचं सेवन केल्यास रक्तवाहिन्यांमधील रक्त प्रवाह सुरळीत होतो.

जपानच्या ओसाका युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट स्कूल ऑफ मेडिसिनच्या तज्ज्ञांनी २०१८ मध्ये एक रिसर्च केला होता. त्यात असं दिसलं की, अल्कालाईन पाण्याचं सेवन केल्यास पचनशक्ती वाढते तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कमी होतो.

क्षारयुक्त पाणी किंवा काळे पाणी शरीराला सामान्य पाण्यापेक्षा जास्त काळ हायड्रेटेड ठेवते. त्याची ph पातळी सामान्य पाण्यापेक्षा जास्त असते, जी ८ ते ८. ५ इतकी असते. काळे पाणी हे एक उत्तम डिटॉक्स ड्रिंक मानले जाते जे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते.

अल्कलाइन पाणी पिण्याने शरीरातील चरबीचे प्रमाण वाढण्यावर प्रतिबंध येतो. वजनवाढ रोखण्यासाठी हे पाणी उपयुक्त ठरते.

अल्कलाइन पाण्याच्या सेवनाने शरीरातील हाडांचे आरोग्य चांगले राहते. महिलांमध्ये वाढत्या वयानुसार हाडांना ठिसूळपणा येण्याची समस्या जाणवते. या पाण्याच्या सेवनाने हाडांना ठिसूळपणा येण्याची प्रक्रिया मंद होऊ शकते.

आकाश आणि विश्वांगी वाघेला या जोडप्याने अनेक रिसर्च करून २०१८ साली वडोदरा येथे Evocus नामक क्षारयुक्त पाण्याचा भारतातील सर्वात पहिला ब्रँड सुरु केला.

आकाश आणि विश्वांगी वाघेला अमेरिकेतून काही खास मिनरल्स भारतात इम्पोर्ट करतात. त्यानंतर त्यावर प्रक्रिया करून १००% शुद्ध क्षारयुक्त पाणी तयार करतात.