घरची भजी विकतसारखी कुरकुरीत होतच नाहीत, तळताना लक्षात ठेवा ५ टिप्स, भजी होतील क्रिस्पी- खमंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 03:20 PM2022-08-10T15:20:06+5:302022-08-10T15:39:08+5:30

१. कोणताही सण म्हटला की घरी भजी तळली जातातच. शिवाय सध्या पावसाळा सुरू असल्याने तर कधीही खमंग कुरकुरीत भजी किंवा पकोडे खाण्याचा मोह होतो.

२. पण घरी भजी तळली की नेमकी एकच अडचण होते.. आपल्याला खायची असतात बाहेर विकत मिळणारी कुरकुरीत क्रिस्पी भजी. पण घरची भजी मात्र नेमकी त्या उलट होतात. मऊसर आणि चांगली जाडजूड.. मग बऱ्याचदा चव जमलेली असली तरी तसं टेक्स्चर न आल्याने मुड जातो...

३. म्हणूनच तर भजी तळताना या काही गोष्टी लक्षात ठेवा आणि या पद्धतींनी भजी तळण्याचा प्रयोग एकदा करून बघा. अशी छान खमंग कुरकुरीत भजी होतील की विकतची भजी खाणं विसरून जाल..

४. पहिली गोष्ट म्हणजे भजी तळण्यासाठी फक्त बेसन वापरू नका. त्यात थोडं तांदळाचं पीठही टाका. बेसनपीठ आणि तांदळाचं पीठ यांचं प्रमाण ३: १ असावं. तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ एकत्र भिजवू नका. बेसनपीठ आधी भिजवून घ्या. आणि तांदळाचं पीठ भजी तळण्याच्या अगदी ऐनवेळी त्यात टाका. त्यामुळे भजी आणखी कुरकुरीत होतील.

५. ज्या भाज्यांची भजी करणार असाल त्या भाज्या अगदी पातळ कापा. उदा कांदा- भजीमधला कांदा अगदी बारीक चिरावा.

६. भजी तळण्यासाठीचं बेसनपीठ खूप पातळ किंवा घट्ट भिजवू नये. पीठ अगदी सरसरीत असावं.

७. भजी तळताना गॅस खूप मोठा किंवा खूपच लहान ठेवू नये. भजी मध्यम आचेवर तळली तर त्याचा कुरकुरीतपणा टिकून राहतो.

८. भजी तळण्यासाठी १ कप तेल घेतलं असेल तर त्यात अर्धा चमचा मीठ टाका. भजींचा कुरकुरीतपणा आणखी वाढेल.