रोजचे वर्क प्रेशर - ताण कसे हाताळायचे? ७ टिप्स, कामाचा आनंद वाढेल आणि जगणं होईल सुसह्य...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2023 02:11 PM2023-01-07T14:11:19+5:302023-01-07T16:04:14+5:30

How To Deal With Work Pressure : ऑफिसमध्ये तणाव दूर ठेवणे खूप गरजेचे असते. हे पूर्णतः शक्य नाही पण तणाव हाताळण्यासाठी काळजीपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.

नोकरी असो किंवा बिझनेस दोन्ही करताना त्यात कामाचा ताण हा थोड्याफार प्रमाणात असतोच. आपण कितीही कामाचा आनंद घेत काम केले तरी कधी कधी कामाचा ताण जाणवतोच. आजच्या काळात सगळेच कॉम्प्युटर नाहीतर मोबाईलवर विविध प्रकारचे काम करतात. त्या तणावात काम करताना आपण एकाच जागेवर बसून खूप वेळ काम करत राहतो. काही काळाने असं तणावाचं काम केल्याचे परिणाम शरीरावर दिसायला लागतात. काहीवेळा कामाचा ताण इतका होतो की आपला आत्मविश्वास देखील डगमगतो परिणामी डिप्रेशन येऊ लागते. अशा तणावामुळे स्ट्रेस, बीपी, डोकेदुखी अशा समस्या वाढायला लागतात. ऑफिसमध्ये तणाव दूर ठेवणे खूप गरजेचे असते. हे पूर्णतः शक्य नाही पण तणाव हाताळण्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत. कामाचा ताण टाळून आपल्याला कामादरम्यान फ्रेश राहायचं असेल तर थोडेसे बदल करावे लागतील. तरच तुमचे आरोग्य चांगले राहील शिवाय कामाची मजाही घेता येईल(How To Deal With Work Pressure).

वर्क प्रेशरला हॅण्डल करण्यासाठी कितीही व्यस्त कामातून छोटे छोटे ब्रेक घेणे हा सर्वात उत्तम उपाय ठरू शकतो. जर आपल्याला दिवसातून तासंतास भरपूर काम करायचे असल्यास वेळेचे नीट नियोजन करून ब्रेक घ्या. सलग तासंतास काम करणे तुमच्या शरीराला धोकादायक ठरू शकते. आपल्या व्यस्त कामातून दर दोन तासांनी एक छोटा १५ मिनिटांचा ब्रेक घ्या. यामुळे ट्युमसिघ मेंदू आणि मन रिलॅक्स रहाण्यास मदत होईल.

सहसा आपण आपल्या कामाच्या बाबतीत खूप गोष्टींचा विचार करून त्या गोष्टी आपल्या मनात दाबून ठेवतो. ज्यामुळे एका ठराविक वेळानंतर त्या गोष्टींचे आपल्या मनावर आपसूकच दडपण येते. त्यामुळे जो काही विचार मनात येत असेल तो वेळच्या वेळी आपल्या सह कर्मचाऱ्यांसोबत शेअर करा. प्रसंगी जे काही वाटत असेल ते मनमोकळेपणाने सांगायला शिका.

आपल्यावर येणाऱ्या वर्क प्रेशरबद्दल किंवा तणावाबाबत कधीही नकारात्मक विचार करु नका. अधिक वर्क प्रेशरमध्ये काम केल्यामुळे तुम्हाला हळुहळु त्याची सवय होऊन जाते. जास्त वर्क प्रेशरमध्ये काम केल्याने तुमच्या परफॉर्मन्समध्ये सुधारणा होण्यास मदत होते. आपल्या परफॉर्मन्समध्ये जर सुधारणा झाली तर करियरमध्ये आपण पुढचे ध्येय गाठू शकतो.

सगळे काम एकट्यानेच करायचा प्रयत्न करू नका. दिलेले काम पूर्ण करण्यासाठी सह कर्मचाऱ्यांची मदत घ्या. इतरांची मदत घेतल्याने तुमचे कामही लवकर पूर्ण होईल व कामाचा तणावही जाणवणार नाही. सगळे काम एकट्यानेच पूर्ण करण्याच्या नादात कधीतरी घाई गडबडीत कामात चुका होण्याची शक्यता असते.

प्रत्येक वेळीच हार्ड वर्क किंवा खूप मेहेनत घेऊन केलेलच काम चांगले होते, असा गैरसमज मनातून काढून टाका. हार्ड वर्क करण्यापेक्षा स्मार्ट वर्क करण्यावर जास्त भर द्या. यामुळे तुमच्यावर कामाचा तणाव येणार नाही आणि वेळही वाचेल. हार्ड वर्क करून ज्या कामासाठी ४ तास जाणार आहेत तेच काम स्मार्ट वर्क करून २ तासांत पूर्ण करणे हे केव्हाही उत्तम आहे.

कामाच्या ठिकाणी प्रत्येकजण आपल्या विचारानुसार मते मांडत असतो. त्यामुळे आजूबाजूचे जे काही बोलत असतील त्यावर रिअ‍ॅक्ट करणे टाळा. कुणाच्या मतांवर, विचारांवर सरळ टीका करण्याचा प्रयत्न करू नका. कोणत्याही गोष्टीवर रिअ‍ॅक्ट करणे टाळून स्वतःचे काम लवकरात लवकर कसे पूर्ण होईल याकडे लक्ष केंद्रित करा.

समोरचा माझ्याबद्दल काय विचार करेल? किंवा मी या व्यक्तीला नाही कसे म्हणू ? असे असंख्य विचार आपल्या मनात सतत येत असतात. "तो माझ्याबद्दल काय विचार करेल"... असे वाटून आपण काही कामांना नाही म्हणत नाही. परंतु हा विचार बाजूला ठेवून 'नाही' म्हणायला शिका.