दीप अमावस्या स्पेशल: पारंपरिक दिव्यांचं अनोखं सौंदर्य, बघा यापैकी कोणकोणते दिवे तुम्हाला माहिती आहेत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2022 02:31 PM2022-07-27T14:31:30+5:302022-07-27T14:38:02+5:30

१. आषाढ अमावस्या हा दिवस दीप अमावस्या म्हणून ओळखला जातो. या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता केली जाते आणि सुंदर आरास मांडून त्यांची मनोभावे पुजा करतात.

२. पुर्वी दिव्यांशिवाय पर्याय नसायचा. पण आता मात्र लाईट आले आणि आपले सगळे जुने पारंपरिक दिवे काळाच्या ओघात विस्मरणात जाऊ लागले. म्हणूनच तर खास दीप अमावस्येनिमित्त बघूया दिव्यांचे काही जुने, सुरेख- सुंदर प्रकार.

३. पणती- दिवाळीला हमखास अजूनही घरांघरांत पणती लागते. दिवाळीत विजेवरच्या, पाण्यावरच्या पणत्या असे पणत्यांचे वेगवेगळे प्रकार येतात. पण अजूनही मातीची पारंपरिक पणती तिचे अस्तित्व टिकवून आहेच.

४. समई- समई अजूनही तिचे महत्त्वाचे स्थान टिकवून आहे. अनेक घरांमध्ये देवापुढे समई लावतात. अजूनही कोणत्याही मोठ्या समारंभाची सुरुवात समईमधील ज्योती लावून दीपप्रज्वलन करूनच होते.

५. निरांजन- औक्षण करण्यासाठी वापरण्यात येतो तो दिवा म्हणजे निरांजन. सणसमारंभाला खास चांदीच्या निरांजनी लावण्यात येतात. खास करून तुपातली फुलवात लावण्यासाठी चांदीची निरांजन वापरली जाते.

६. दिवटी आणि बुधली- साधारण हातभर लांब दांडा असणारा हा छोटा दिवा दिसायला अतिशय देखणा असतो. अजूनही खंडोबा आणि देवीच्या काही मंदिरांमध्ये आरतीसाठी दिवटी आणि बुधली वापरण्यात येते. या दिव्याच्या दांड्यावर सुबक नक्षी केलेली असते.

७. चिमणी- जुन्या काळी घरोघर प्रकाश देणारी रॉकेलवर चालणारी चिमणी आता मात्र खेड्यापाड्यांतूनही गायब झाली आहे.

८. कंदील- चिमणीचा मोठा भाऊ म्हणजे कंदील अशी या दिव्याची ओळख. खेड्यांमध्ये काही घरांत अजूनही कंदील दिसून येतात. शो साठी किंवा ॲण्टीक पीस म्हणून काही घरांमध्ये कंदील ठेवला जातो. आता तर बॅटरीवर चालणारे कंदीलाच्या आकाराचे दिवेही मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

९. लामण दिवा- पाचही बाजूंनी दिवे लावता येतील अशी पंचारतीची सोय आणि मधोमध वर अडकविण्यासाठी साखळी असणारा हा दिवा काही मंदिरांमध्ये दिसून येतो. या दिव्याची रचना आणि त्यावरची नक्षी देखणी असते.

१०. दीपलक्ष्मी- लक्ष्मीची सुंदर मुर्ती आणि तिच्या हातात दिवा.... अशा धाटणीच्या दिव्याला किंवा मुर्तीला दीपलक्ष्मी म्हणून ओळखले जाते.

११. अखंड दिवा- देवाजवळ रोज आपण जो अशा पद्धतीचा दिवा लावतो त्याला अखंड दिवा म्हणून ओळखलं जातं. दोरवातीचा तेलाचा दिवा लावण्यासाठी अखंड दिवा वापरला जातो.