डाळिंब खाऊन सालं फेकून देऊ नका; डाळिंबाच्या सालींचे ८ जबरदस्त फायदे, अत्यंत आरोग्यदायी उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2022 02:49 PM2022-12-16T14:49:55+5:302022-12-16T15:56:34+5:30

१. डाळिंबाचे लालचुटूक गोड दाणे खाऊन आपण त्याची सालपटं हमखास फेकून देताेच. कारण त्या सालीही आरोग्यासाठी गुणकारी असतात, हे आपल्याला माहितीच नसतं.

२. पण डाळिंबाएवढेच पौष्टिक गुण त्याच्या सालींमध्येही असतात. अगदी आरोग्यापासून ते सौंदर्यापर्यंत प्रत्येक गोष्टीसाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. म्हणूनच त्यांचे नेमके उपयोग काय आणि डाळिंबाच्या साली वापरायच्या कशा याविषयी बघूया.

३. बॉडी डिटॉक्स करण्यासाठी डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो. एका अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की शरीरातून टॉक्झिन्स म्हणजेच विषारी द्रव्ये बाहेर काढून टाकण्यासाठी डाळिंबाच्या सालींमधले गुणधर्म अतिशय उपयुक्त ठरतात.

४. त्वचेतील कॉलॅजीन ब्रेकडाऊन होऊ नये, यासाठीही डाळिंबाच्या साली उपयोगी ठरतात. त्यामुळे त्वचा अधिक काळ तरुण, तजेलदार राहण्यास मदत होते.

५. शिवाय त्वचेवरील पिंपल्सचे डाग, ॲक्ने, पुरळं कमी करण्यासाठीही डाळिंबाच्या सालींचा उपयोग होतो.

६. हृदयरोग आणि मधुमेह असणाऱ्यांसाठीही डाळिंबाच्या सालींची पावडर उपयोगी ठरते. शिवाय त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲण्टीऑक्सिडंट्स असतात.

७. डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी आणि केसांचं गळणं थांबविण्यासाठी डाळिंबाच्या सालींची पावडर उपयोगी ठरते. ही पावडर तेलामध्ये टाका आणि त्याने डोक्याला मालिश करा. साधारण २ तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका.

८. घशात खवखव होत असेल, घसा खूप दुखत असेल तर डाळिंबाच्या सालींची पावडर गरम पाण्यात टाकून त्याने गुळण्या करा. घशाला आराम मिळेल. कारण त्यात ॲण्टीबॅक्टेरियल घटक मोठ्या प्रमाणात असतात.

९. डाळिंबाच्या दाण्यांपेक्षाही त्याच्या सालींमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते.

१०. वारंवार तोंड येण्याचा त्रास असेल तर डाळिंबाच्या सालींच्या पावडरीने गुळण्या करा. त्यातील ॲण्टी फंगल आणि ॲण्टीमायक्रोबियल गुणधर्म तोंडातील फोड, जखमा बऱ्या करण्यासाठी गुणकारी ठरतात.

११. डाळिंबाच्या सालींची पावडर करण्यासाठी सालं कडक उन्हात २ ते ३ दिवस वाळवून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची बारीक पावडर करून घ्या.