त्वचा निस्तेज, कोरडी झाली? ८ पदार्थ खा, त्वचा दिसेल टवटवीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2022 08:01 PM2022-11-20T20:01:58+5:302022-11-20T20:14:18+5:30

Winter Problems Skin Care Tips हिवाळ्यात त्वचेच्या संबंधित बऱ्याच तक्रारी उद्भवतात, 'या' ८ गोष्टींचा करा आहारात समावेश

हिवाळा हा ऋतू सुरू झाला आहे. या ऋतूत अनेकांना स्किनच्या निगडित समस्या उद्भवतात. त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचा पोत देखील खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे हिवाळ्याच्या हंगामात त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. साधाणरत: त्वचेचा कोरडेपणा, पापुद्रे निघणे, त्वचा निस्तेज होणे, काळपटपणा असे तक्रारींचे स्वरूप असते. हे टाळण्यासाठी चेहऱ्यावर फक्त क्रीम अथवा मॉइश्चरायझर काम करत नाही. तर आहारात विविध पौष्टिक घटकांचा समावेश करणे तितकेच महत्त्वाचे आहे.

दह्यामध्ये प्रोटीन तत्वे आहेत, हे चेहऱ्यावर सुरकुत्या पडू देत नाही. ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर दिसेल. यासाठी आहारात दह्याचा समावेश करणे योग्य ठरेल. अनेक लोकं थंडीत दही खात नाहीत. दही हा थंड पदार्थ नसून गरम आहे. त्यामुळे दही खाणे टाळू नये.

जेवणात ऑलिव्ह ऑईलचा वापर करा. त्यात असे अँटीऑक्सिडंट आढळून येतात, जे चेहऱ्यावर अकाली वृद्धत्व दिसण्यापासून रोखण्यास मदत करते.

अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड्स मोठ्या प्रमाणावर आहे. जे त्वचेसाठी वरदान म्हणून काम करतात. खरं तर, ओमेगा 3च्या कमतरतेमुळे, त्वचेची आर्द्रता कमी होते. त्यामुळे अक्रोडचा दैनंदिन आहारात समावेश करा.

डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट बऱ्याच प्रमाणात आहे. जे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन नियंत्रित ठेवण्यास देखील मदत मिळते .

संत्र्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. संत्र्याच्या साली वाळवून बारीक करून अनेक प्रकारच्या फेस पॅकद्वारे वापर करा. याचा चेहऱ्याला फायदा खूप होईल.

दररोज कॉफी पिणाऱ्यांचे अनेक फायदे आहेत. कॉफी पिल्याने त्वचेच्या कर्करोगाच्या मेलेनोमाचा धोका मोठ्या प्रमाणात टाळता येतो. त्यामुळे कॉफी प्या, अथवा फेसपॅकद्वारे चेहऱ्यावर लावा.

टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी आणि लाइकोपीन असते. जे एक अँटिऑक्सिडेंट आहे. हे त्वचा तरुण ठेवते आणि वृद्धत्व टाळते. आपण नियमितपणे टोमॅटोचे सेवन करू शकता.

गाजर बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए च्या सर्वोत्तम स्त्रोतांपैकी एक आहे. ही दोन्ही जीवनसत्त्वे मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करतात. ते त्वचेचे वृद्धत्व रोखतात.