प्रत्येक महिलेसाठी सुपरफूड ठरणारे ३ पदार्थ, आजारपण फिरकणार नाही, नेहमीच राहाल उत्साही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2025 15:59 IST2025-01-10T15:32:32+5:302025-01-10T15:59:29+5:30

बहुतांश महिलांची ही तक्रार असते की साधारण तिशी- पस्तीशीनंतर त्यांची पाठ- कंबर नेहमीच दुखते. थोडं जास्त काम झालं तरी लगेच गळून जायला होतं. खूप थकवा येतो.
त्यामुळेच तर असा त्रास टाळायचा असेल तर काही पौष्टिक पदार्थ प्रत्येक महिलेने रोजच्या रोज नियमितपणे खायलाच हवेत. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी karankakkad_official या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(3 Essential Seeds Every Woman Should eat)
यातला पहिला पदार्थ आहे तीळ. दररोज १ ते २ टीस्पून तीळ खावे. कारण त्यातून भरपूर प्रमाणात कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम मिळतं. त्यामुळे हाडांचं दुखणं बऱ्याच प्रमाणात कमी होतं. शरीरातील हार्मोन्सचे संतुलन ठेवण्यासाठीही तीळ खाणं खूप फायदेशीर ठरतं.
दुसरा पदार्थ आहे अळीव. बहुतांश महिलांच्या शरीरात लोहाची कमतरता असते. ती भरून काढण्यासाठी अळीव खाणं फायद्याचं ठरतं. त्यामध्ये भरपूर प्रमाणात ॲण्टीऑक्सिडंट्सही असतात. एक ते दोन टीस्पून अळीव रोज खावेत. किंवा अळीवाची खीर, लाडू, वडी या माध्यमातूनही तुम्ही ते खाऊ शकता.
चिया सीड्स हा ओमेगा ३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन्सचा खूप चांगला स्त्रोत आहे. पचनक्रिया सुधारण्यासाठी तसेच हृदयाच्या आरोग्यासाठीही त्याचा चांगला फायदा होतो.