डायबिटीस राहील कंट्रोलमध्ये, मधुमेहींसाठी ५ व्यायाम, नियमित करा- फिट रहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2022 08:14 AM2022-11-13T08:14:21+5:302022-11-13T08:15:01+5:30

१. आजकाल बदललेल्या जीवनशैलीमुळे मधुमेह किंवा डायबिटीससारखा आजार कमी वयातच गाठत आहे. त्यामुळे वयाचा आणि या आजाराचा काही संबंध राहिलेला नाही.

२. रक्तातील साखर आणि इन्सुलिन यांच्यात जेव्हा असंतुलन निर्माण होतं, तेव्हा डायबिटीस होतो. डॉक्टरांचा सल्ला, योग्य आहार आणि नियमित व्यायाम, अशी पथ्ये पाळली तर डायबिटीस नक्कीच नियंत्रणात ठेवता येतो.

३. म्हणूनच मधुमेह असणाऱ्यांनी कोणते व्यायाम नियमितपणे करावेत, किंवा ज्यांना मधुमेह नाही अशा व्यक्तींनीही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी कोणते व्यायाम करावे, याची माहिती karthikmayur या इन्स्टाग्राम पेजवर देण्यात आली आहे.

४. हाफ कॅमल पोझ (half camel pose)हा व्यायाम डायबिटीस असणाऱ्यांनी नियमितपणे करावा. हा व्यायाम करण्यासाठी गुडघ्यावर उभे रहा. दोन्ही हातांनी कंबरेला पकडा आणि डोके, मान, छाती शक्य तेवढं मागच्या बाजुने वाकविण्याचा प्रयत्न करा.

५. मंडुकासन (mandukasana) हा दुसरा व्यायाम. यासाठी वज्रासनात बसा. दोन्ही हातांच्या मुठी करा आणि त्या ओटीपोटावर दाबून ठेवा. आता हळूहळू खाली वाका. १० ते १५ सेकंद ही आसनस्थिती टिकवून ठेवा.

६. सीटेड फॉरवर्ड बेंड (seated forward bend) हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय समोर पसरून घ्या. आता पुढच्या दिशेने वाकत दोन्ही हातांनी दोन्ही पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा.

७. सीटेड ट्विस्ट (seated twist) हा व्यायाम करण्यासाठी दोन्ही पाय समोरच्या बाजूने पसरवा. उजवा पाय गुडघ्यात दुमडून घ्या आणि तो डाव्या पायाच्या बाहेरील बाजुला ठेवा. आता डावा हात उजव्या पायाच्या गुडघ्याच्या उजव्या बाजुने ठेवा. चेहरा आणि पाठ उजवीकडे वळवा. दोन्ही बाजूने हा व्यायाम करा.

८. साईड बेंड (side bend) हा व्यायाम करण्यासाठी मांडी घालून बसा. उजवा हात वर उचला आणि डोक्यावरून तो डाव्या बाजुला झुकवा. दोन्ही बाजूने हा व्यायाम करा.