फॅट टू फिट: भूमी पेडणेकरनं कसा पूर्ण केला फिटनेस गोल? वेटलॉससाठी भूमीचा मंत्र फार फायद्याचा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 06:42 PM 2021-09-24T18:42:09+5:30 2021-09-24T18:49:57+5:30
‘दम लगाके हैइशा’ चित्रपटातील लठ्ठ भूमी आठवते ना? हीच भूमी पेडणेकर पुढे जाऊन फिटनेससाठी इतरांचा आदर्श बनेल असं वाटलं तरी होतं का? पण भूमीने फॅट टू फिटचा प्रवास निर्धारानं केला. तिच्या या फिटनेस प्रवासाची प्रेरणादायी गोष्ट फॅट टू फिट म्हटलं तर अभिनेत्री भूमी पेडणेकरचं उदाहरण चटकन डोळ्यासमोर उभं राहातं. ‘दमा लगा के हईशा’ या चित्रपटातील लठ्ठ भूमीने चार महिन्यात 21 किलो वजन कमी करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. तिचं चित्रपटासाठी वजन कमी करणं जितकं खरं तितकंच वजन कमी करुन फिट होणंही तितकंच खरं आणि प्रेरणादायी आहे.
भूमीच्या फिटनेसचं रहस्य तिच्या व्यायाम आणि आहाराच्या नियमांमधे आहे. भूमी सतत स्वत:साठी फिटनेस गोल ठेवते आणि ते पूर्ण करते. वजन कमी होण्यासोबतच स्वत:मधली क्षमताही वाढली पाहिजे हा फिटनेस गोल मागचा तिचा उद्देश. काही महिन्यांपूर्वी या फिटनेस गोलचा एक भाग म्हणून भूमीनं बांबूच्या जंगलात 950 पायर्या न थांबता चढण्याचा एक व्हिडीओ टाकला होता. तेव्हापासून भूमीच्या फिटनेसबद्दल सगळ्यांना कुतुहल वाटतंय.
वजन कमी करणे आणि फिटनेस राखणे यासाठी आपल्या व्यायामाच्या दिनचर्येत कार्डिओ, वेट ट्रेनिंग आणि योग या तीन व्यायाम प्रकारांना भूमी महत्त्वाचं स्थान देते. या तीन व्यायाम प्रकारातून शरीराला आवश्यक असलेला सर्व प्रकारचा व्यायाम मिळतो असं भूमी म्हणते.
फिटनेससाठी केवळ व्यायामच नाही तर आहाराकडेही भूमीचं बारीक लक्ष असतं. ती त्याबाबतचे नियम कटाक्षाने पाळते. वजन कमी करण्यासाठी भूमी संतुलित आहारावर भर देते. आहारात प्रथिनांचं प्रमाण जास्त आणि फॅटस कमी असतील अशा पदार्थांचा समावेश ती आपल्या आहारात करते.
वजन कमी करण्यासाठी आहारात भूमीने तुपाला जास्त महत्त्व दिलं आहे. तूप, ताक, लोणी यांचा समावेश भूमीच्या रोजच्या आहारात असतो. पण ते घेताना किती खावं प्यावं याकडे भूमीचं बारीक लक्ष असतं.
वजन कमी करण्याचा प्रवास ध्येय गाठेपर्यंत आणि गाठल्यानंतरही निरंतर करावा लागतो. कारण वजन कमी केल्यानंतर फिटनेस महत्त्वाचा असतो. तो राहिल तरच पुढे वजनावर नियंत्रण ठेवता येतं असं भूमी म्हणते. वजन कमी करताना चीट डे म्हणून बाहेरचं वेगळं खायला गेलं तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते हे भूमीला माहिती असल्यामुळे भूमी घरच्या जेवणाला महत्त्व देते. आणि काही वेगळं खावंसं वाटलं तरी ते घरीच बनवून खाते.
भूमीच्या मते घरचं ताजं अन्न, स्थानिक पदार्थ, हंगामी फळं भाज्या यांना आहरात महत्त्व दिलं तरच निरोगी आरोग्य आणि फिटनेसचं ध्येय गाठता येतं. भूमी म्हणते वजन खाऊन पिऊन कमी करावं. उपाशी राहून वजन कमी होत नाही उलट वाढतंच.
स्लिम आणि फिट दिसण्यासाठी फिटनेस महत्त्वाचा तो व्यायाम आणि आहाराचे नियम पाळूनच मिळवता येतो असं भूमीचं ठाम म्हणणं आहे, तिच्या म्हणण्यात किती तथ्यं आहे हे आताच्या भूमीकडे पाहिलं की सहज पटतं.