फ्लॉवर ज्वेलरीचा हटके ट्रेंड; हलक्या-फुलक्या ज्वेलरीत खुलेल सौंदर्य, नक्की ट्राय करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2022 03:04 PM2022-11-27T15:04:37+5:302022-11-27T15:09:05+5:30

Flower Jewelry New Trend Fashion Tips : पारंपरिक दागिन्यांना उत्तम पर्याय

फ्लॉवर ज्वेलरीचा ट्रेंड गेल्या काही वर्षांपासून एकदम फॅशन इन आहे. हळद, मेंहदी, डोहाळजेवण अशा सगळ्या कार्यक्रमांना नेहमीच्या ज्वेलरीला पर्याय म्हणून ही ज्वेलरी आवर्जून वापरली जाते (Flower Jewelry New Trend Fashion Tips).

तेच तेच सोन्या-चांदीचे किंवा खोटे दागिने घालण्यापेक्षा आपल्या कपड्यांना मॅचिंग असे रंगबिरंगी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे हे दागिने कधीतरी आपल्यावर छान शोभून दिसतात.

हे दागिने आपल्याला आवडतील अशा खऱ्या फुलांमध्ये तर बनवले जातातच पण खोट्या सोलावूडच्या फुलांमध्ये तयार केलेले हे दागिनेही फार छान दिसतात. मोत्यांचा बेस देऊन आपल्याला हव्या त्या रंगांमध्ये हे दागिने मिळतात.

वेगवेगळ्या रंगाच्या कॉम्बिनेशनमध्येही हे दागिने खूप खुलून येतात. अगदी नथीपासून ते बाजुबंद, अंगठी, कंबरपट्टा, हेअरस्टाईल अशा सगळ्या प्रकारचे दागिने या फुलांमध्ये बनवले जातात आणि ते दिसतातही खूप सुंदर.

पारंपरिक दागिन्यांपेक्षा थोडे वेगळे आणि आपला लूक थोडा हटके करणारे हे दागिने लहान-मोठ्या फंक्शनच्या निमित्ताने आपण नक्की ट्राय करु शकतो. खोट्या फुलांचे हे दागिने टिकणारे असल्याने आपण ते पुन्हा-पुन्हाही वापरु शकतो.

मोगऱ्याच्या कळ्यांसारख्या पांढऱ्या कळ्या आणि लाल रंगाचा गुलाब हे या दागिन्यांमध्ये सर्वात जास्त वापरले जाणारे कॉम्बिनेशन आहे. कोणत्याही प्रकारची साडी, घागरा, पंजाबी ड्रेस यावर हे कॉम्बिनेशन उठून दिसते.

फुलांचे हे दागिने काहीवेळा थोडे मोठे आणि बटबटीत वाटत असले तरी आपलाच कार्यक्रम असेल आणि आपण उठून दिसायला हवे असेल तर हे दागिने फारच छान दिसतात. मोठे असल्याने या दागिन्यांमध्ये फोटोही खूप सुंदर येतात.