गौरी गणपतीत सुंदर पारंपरिक लूक हवा? पाहा ७ हेअरस्टाइल, सुंदर - साजिरे - सोज्वळ रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2022 11:35 AM2022-08-29T11:35:48+5:302022-08-29T12:08:29+5:30

Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options : आपल्याला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल झटपट करता आली तर आपल्या लूक आणखी खुलून येतो.

गौरी गणपती म्हटलं की साडीमधला पारंपरिक लूक ओघानेच आला. साडी, ब्लाऊज, मेकअप, दागिने या सगळ्याची तयारी झाल्यावर केसांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. आपल्याला सूट होईल अशी एखादी हेअरस्टाईल झटपट करता आली तर आपल्या लूक आणखी खुलून येतो. पाहूया अशाच काही सोप्या हेअरस्टाइल (Ganpati Festival Traditional Look Perfect Hairstyle Options).

तुमचे केस थोडे कुरळे असतील आणि मोकळे सोडायचे असतील तर मध्यभागी एखादी लहानशी वेणी किंवा एकमेकांमध्ये गाठी मारुन खालचे केस मोकळे सोडले तरी छान दिसते. केस खांद्याच्या खाली येणारे असतील तर ही हेअरस्टाइल मस्त दिसू शकते. सध्या बाजारात अशाप्रकारच्या हेअरस्टाइलवर लावण्यासाठी फुले, वेगवेगळ्या पिन्स दिसतात.

फ्रेंच बन ही पारंपरिक हेअरस्टाइल असली तरी साडी, डिझायनर ड्रेस, घागरा, नऊवारी साडी अशा कोणत्याही कपड्यांवर ही हेअरस्टाइल अतिशय सुंदर दिसते. यामध्ये साईड बन घालून त्याला छान सजवता येऊ शकते. केस एकदा वर बांधलेले असतील की आपल्याला त्यांच्याकडे लक्ष तर द्यावे लागतच नाही आणि कामही नीट करता येते.

सागरवेणी किंवा पाचपेडी वेणी हाही एक पारंपरिक पण सुंदर असा पर्याय आहे. जुनी फॅशन काही वर्षांनी पुन्हा येते म्हणतात त्यातलाच हा एक प्रकार. वेणीवर आपल्याला काही ना काही फुलं किंवा सजवण्याच्या वस्तू लावता येऊ शकतात.

केस मोकळे सोडून दोन्ही बाजुने बट घेऊन किंवा कानाच्या वरुन बारी वेण्या घालून त्या मागे मध्यभागी बांधल्या तर अतिशय सुंदर दिसतात. हा लूक मॉडर्न आणि पारंपरिक अशा दोन्ही पद्धतीत मोडत असल्याने साडी, ड्रेस अशा कोणत्याही कपड्यांवर तो छान दिसतो.

पोनी टेल हा सर्वात सोपा आणि झटपट होणारा प्रकार. यामध्येही आपण साईड पार्टीशन, मध्यभागी पार्टीशन किंवा पार्टीशन न घेता छानसा पोनीटेल बांधू शकतो. सिल्की केसांसाठी किंवा कुरळ्या केसांसाठीही ही हेअरस्टाईल सूट होणारी आणि सहज करता येणारी असल्याने यामध्ये फारसा वेळ जात नाही.

केस मोकळे सोडणे हाही एक उत्तम पर्याय असतो. आपले केस लहान असो किंवा मोठे आपल्याला केस मोकळे सोडायची सवय असेल तर काहीच न करता केस छान मोकळे सोडले तरी आपला लूक सिंपल तरी साडीसाठी साजेसा होऊ शकतो.

बन हाही अतिशय सहज करता येणारा पारंपरिक प्रकार आहे. बाजारात यासाठी अनेक गोष्टी सहज उपलब्ध असल्याने त्या आणल्या की आपल्याला झटपट बन करता येतो. यासाठी आपण उघड्या डोळ्यांनी बाजारात चक्कर मारायला हवी. मेसी बन, कलरफूल बन, फुलांचा बन असे बरेच प्रकार यामध्ये पाहायला मिळतात.