आजचा रंग ग्रे : करड्या रंगाचे हे ७ चविष्ट पदार्थ खाल्ले तर वर्षभर तब्येत राहील ठणठणीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2023 08:00 AM2023-10-21T08:00:00+5:302023-10-21T08:00:01+5:30

आपल्यापैकी काहीजण नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास धरतात. उपवासाबरोबरच काहीजण हे नऊ दिवसांचे नवरंग अतिशय आवडीने व हौसेने फॉलो करतात. कपड्यांचे हे नऊ रंग फॉलो करण्यासोबतच आपल्या रोजच्या आहारातही त्या विशिष्ट रंगाच्या पदार्थांचा समावेश केल्याने आपले आरोग्य देखील चांगले राखण्यास मदत होते(Today's Color Grey : Check out 7 Nutritious Grey Foods, Include In Your Diet).

ज्वारीमध्ये फायबरचे प्रमाण हे अधिक असते. रोजच्या आहारात ज्वारीच्या भाकरीचा समावेश केल्यास गॅसेस, बद्धकोष्टता, पोट साफ न होणे, यांसारख्या अनेक पोटाच्या समस्या दूर करण्यास मदत होते.

कारळे किंवा खुरसणी ही तेलबियांपैकी एक आहे. त्यापासून केलेली कारळ्याची चटणी हा महाराष्ट्रीय जेवणातील अस्सल गावरान पदार्थ आहे. कारळ्याची चटणी आणि ज्वारीची भाकरी खायला अतिशय पौष्टिक व चविष्ट लागते.

आपल्या पचनक्रियेसाठी सब्जा अतिशय लाभदायक आहे. सब्जामध्ये फायबरची मात्रा भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत सुरू राहते. आपण दिवसभरात कधीही सब्जाचे पाणी पिऊ शकता. यामुळे अन्नाचे पचन सहजरित्या होण्यास मदत होते.

बाजरीच्या पिठाची भाकरी तर आपण नेहमीच खातो. परंतु काहीतरी वेगळं खायचा मूड झाला की आपण हेच बाजरीचे पीठ, रवा, दही भिजवून त्याचे झटपट डोसे तयार करुन खाऊ शकतो.

आपण ज्वारी - बाजरी - नाचणी ही तिन्ही पीठ वापरुन त्याचे छान पौष्टिक आंबील बनवू शकतो. ज्याला इंग्रजीत 'ब्रॉथ' म्हणतात तसा हा प्रकार आहे, जाडसर पेय,भूक आणि तहान दोन्ही शमवण्यासाठी आंबील पिणे हे फायदेशीर ठरते.

काळी उडदाची डाळ ही आरोग्यासाठी अनेक स्वादिष्ट व फायदेशीर डाळींपैकी एक आहे. आपण काळ्या उडदाच्या डाळीला खमंग फोडणी देऊन त्याची चविष्ट व रुचकर उसळ बनवून खाऊ शकता. काळ्या उडीद डाळीमध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह आणि कॅल्शियम इत्यादी आवश्यक खनिजे आणि जीवनसत्त्वे असतात.

काळ्या द्राक्षांचा रोजच्या डाएटमध्ये समावेश केल्याने शरीरातील अशक्तपणा कमी होण्यास मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणात लोह, व्हिटॅमिन - बी असते. हे लाल रक्तपेशींच्या वाढीस मदत करते.