दिवाळीसाठी ट्रॅडीशनल तरी ट्रेंडी ज्वेलरी घ्यायचा प्लॅन आहे? पाहा राणी मुखर्जीचा आवडता ज्वेलरी प्रकार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 10:10 AM2022-10-11T10:10:36+5:302022-10-11T10:15:02+5:30

Gutta Pasalu Haram South Indian Traditional Jewelry : साऊथ इंडीयन ज्वेलरीतील गुट्टा पसालू हराम हा प्रकार खूपच सुंदर दिसतो.

आपण ज्वेलरीमध्ये अनेक वेगवेगळे प्रकार खरेदी करतो. मात्र त्यातही दक्षिणेकडील ज्वेलरीला तरुणींची आणि सेलिब्रिटींची विशेष पसंती मिळते. साऊथ इंडीयन ज्वेलरीतील गुट्टा पसालू हराम हा प्रकार खूपच सुंदर दिसतो. प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी हिला या प्रकारातील ज्वेलरी आवडत असून ती बरेचदा यामध्ये दिसून येते (Gutta Pasalu Haram South Indian Traditional Jewelry).

पारंपरिक पद्धतीची ही ज्वेलरी प्रामुख्याने आंध्र प्रदेशमध्ये वापरली जात असून ती सोनं, खडे, बारीक मोती यांचा वापर करुन केली जाते. लग्नात नवरी मुलगी आवर्जून ही ज्वेलरी घालतात. इतकेच नाही तर दुसऱ्याच्या समारंभात जाण्यासाठीही ही ज्वेलरी घातली जाते.

महाराष्ट्रात ज्याप्रमाणे चिंचपेटी, ठुशी, कोल्हापूरी साज अशी पारंपरीक ज्वेलरी मोत्यात किंवा सोन्यात केली जाते त्याचप्रमाणे आंध्र प्रदेशमध्ये बारीक आकाराचे पांढरे मोती, गुलाबी आणि हिरवे खडे यांचा वापर या गुट्टा पुसालू हराम ज्वेलरीमध्ये केला जातो.

पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुयोग्य संगम असलेल्या या ज्वेलरी प्रकारात गेल्या काही वर्षात बरेच प्रकार पाहायला मिळतात. त्यामुळे एखाद्या समारंभात ही ज्वेलरी घातली तर आपल्याला ट्रॅडीशनल तरी ट्रेंडी लूक मिळतो.

यामध्ये वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात. विशेषत: लहान आकाराच्या मोत्यांमुळे या ज्वेलरीला एक प्रकारचा वेगळाच लूक येतो. आपल्या आवडीनुसार यामध्ये भरगच्च आणि नाजूक असे दोन्ही प्रकार मिळतात.

पारंपरिक प्रकारच्या साड्या, लेहंगा यांवर ही ज्वेलरी खूप उठून दिसते. ही ज्वेलरी हेवी असल्याने त्याचा एक सेट घातल्यावर बाकी काहीच घालायची गरज पडत नाही. तुम्हाला सगळ्यांमध्ये उठून दिसायचे असेल तर ही ज्वेलरी उत्तम पर्याय ठरु शकतो.