नवरात्रीत करा सुंदर वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स, त्यासाठी स्वस्तात मस्त ५ ॲक्सेसरीज- बदलून टाका तुमचा लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2022 07:39 PM2022-09-22T19:39:05+5:302022-09-22T19:55:27+5:30

Hair Accessories For Hairstyle in Navratri : सणावाराला तुम्ही दिसाल सुंदर-हटके

सणवार आले की आपल्या सगळ्यांची साडी, ब्लाऊज, मेकअपची उत्पादने, मॅचिंग दागिने यांबाबतचे प्लॅनिंग सुरू होते. पण केसांचे काय करायचे याचा मात्र आपण तितका विचार करत नाही. मग ऐनवेळी आपली तारांबळ उडते, असे होऊ नये म्हणून बाजारात स्वस्तात मस्त मिळणाऱ्या काही हेअर अॅक्सेसरीजविषयी आपण जाणून घेणार आहोत (Hair Accessories For Hairstyle in Navratri).

ज्यांचे केस लहान आहेत किंवा उकाडा असल्याने ज्यांना मोकळे न सोडता डोक्यावर फॅन्सी बन बांधायचा आहे अशांसाठी सध्या बाजारात अतिशय सुंदर आणि आकर्षक अशा अॅक्सेसरीज उपलब्ध झाल्या आहेत. या अॅक्सेसरीजमुळे आपला सणावारांचा लूक आणखीनच चांगला दिसतो.

नवरात्रीचा सण म्हणजे खास महिलांचा सण असल्याने या काळात रोजचा वेगळा रंग फॉलो करत असताना आपल्याला कोणाकडे आरतीला, देवीच्या दर्शनाला, भोंडल्याला किंवा अगदी दांडीया खेळायला जायचे असेल तेव्हा आपण हेअरस्टाईलने थोडा हटके लूक कॅरी करु शकतो.

बनचा विचार करत असाल तर साध्या बनपासून ते मेसी बन यांसारखे बरेच पर्याय सध्या बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये वेगवेगळे रंग आणि आकार पाहायला मिळतात. हे बन तुम्हाला अगदी ५० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत सहज उपलब्ध होतात.

याशिवाय बनच्या बाजुने लावण्याच्या फुलांमध्येही बरेच नवनवीन प्रकार बाजारात पाहायला मिळतात. यात गुलाब किंवा मोगरा या फुलांच्या डीझाईन्स जास्त प्रमाणात असल्या तरी त्यातही साडीला किंवा ब्लाऊजला मॅचिंग रंग, वेगवेगळे आकार असे बरेच पर्याय आहेत. ही फुले इतकी आकर्षक आहेत की पाहणाऱ्याला ती खरी आहेत की खोटी असा प्रश्न पडावा.

बन घातल्यावर आपण साधारणपणे त्याच्या मध्यभागी काहीतरी डेकोरेटीव्ह लावतो. यामध्ये खड्यांचे, मोत्यांचे किंवा कुंदन असलेले वेगवेगळ्या पॅटर्नचे छान छान ब्रुच मिळतात. हे ब्रुच बनच्या किंवा आंबाड्याच्या मध्यभागी लावल्याने आपल्या हेअरस्टाईलला एकदम उठाव येतो. यामध्येही अगदी ५० रुपयांपासून २५० ते ३०० रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत.

याशिवाय अगदी साधी आणि सिंपल हेअरस्टाईल करायची असेल तर काही हटके पद्धतीच्या पण तितक्याच आकर्षक हेअरपिन्सही बाजारात मिळतात. या हेअरपिन्स ऑनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करता येतात. यांची किंमत जास्त नसून त्यामुळे आपला सणाचा लूक खुलून यायला मदत होते.